विशेष लेख वेव्हज् २०२५ प्रज्ञा, प्रतिभा आणि अद्ययावत तंत्राचा अनोखा संगम
विशेष लेख
वेव्हज् २०२५
प्रज्ञा, प्रतिभा आणि अद्ययावत तंत्राचा अनोखा संगम
मुंबईत दि. १ ते ४ दरम्यान आयोजित करण्यात आलेली वेव्हज- २०२५ ही जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद ही भारतीय मनोरंजन विश्वातील अनन्यसाधारण घटना आहे. कला, संस्कृती, प्रतिभा यांचा समृद्ध वारसा लाभलेल्या भारत देशातील नानाविध कलावंतांना, तंत्रज्ञांना याद्वारे हक्काचे व्यासपीठ प्राप्त झाले आहे. जगातील १०० हून अधिक देशातील कलावंत, प्रतिभावंत, तंत्रज्ञ या परिषदेत सहभागी होत आहेत.
भारतातील मनोरंजन क्षेत्र नानास्तरीय व व्यापक आहे. येथील जीवनशैलीशी कथेची वीण घट्टपण जोडली गेली आहे. येथील महाकाव्यांपासून पौराणिक कथांपर्यंत, गीतरूपी कहाण्या, पोवाडे, गद्य- पद्य यातून होणारी नाना पद्धतींची कथात्मक मांडणी हा भारताचा वारसा समृद्ध आहे.
चांगल्या कथांना कायम मागणी असते. चांगल्या कलेला बाजारपेठेत चांगले मोल मिळते. चांगली गाणी सर्वदूर ऐकली जातात. चांगली सादरीकरणे देशाच्या कानाकोप-यात होत असतात. येथील कलेचा समृद्ध वारसा ही येथील मनोरंजन क्षेत्राची ताकद आहे. हेच ओळखून हे क्षेत्र अधिक व्यापक बनविण्यासाठी, जागतिक स्तरावर त्याची ओळख ठळक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्राला परिवर्तनाची प्रेरणा दिली.
महाराष्ट्राने परिषदेचे यजमानपद स्वीकारले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या परिषदेचे दिखामदार आयोजन होत आहे. अनेक कलांचे माहेरघर असलेल्या मुंबई व महाराष्ट्रासाठी या परिषदेचे यजमानपद मिळणे हा गौरवच आहे.
ही परिषद मुंबईत होत असल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, औद्योगिक व पर्यटन संस्कृती आणि परंपरा जगभरात पोहोचण्यास मदत होणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, औद्योगिक व पर्यटन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्याची संधी आहे. परिषदेला ३३ देशांतील मंत्री व मंत्रीस्तरीय अधिकारी, तसेच १२० आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिका-यांची उपस्थिती, बॉलिवूड, टॉलीवूड, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार व निर्माते यांचा सहभाग मिळाला आहे.
या चार दिवसीय सोहळ्यात भारत पॅव्हेलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियन, तेलंगणा पॅव्हेलियन तसेच अन्य संस्थांचेही पॅव्हेलियन उभारण्याबरोबरच विविध क्षेत्रांतील परिसंवाद, राउंड टेबल कॉन्फरन्स, आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशी रेलचेल आहे.
भारताचे कला- सांस्कृतिक क्षेत्र वैविध्यपूर्ण, विशाल व व्यापक आहे. मुंबई ही मीडिया आणि मनोरंजनाचे केंद्र राहिली आहे. तंत्रज्ञानातही भारताने मोठी आघाडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत होणा-या या परिषदेमुळे मनोरंजन क्षेत्राला तांत्रिकदृष्ट्या नवी ओळख मिळणार आहे. ही परिषद प्रज्ञा, प्रतिभा, तंत्रज्ञानाचा अनोखा संगम ठरणार आहे.स्थानिक कला कंपन्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्टुडिओ, प्रॉडक्शन हाऊस, टेक कंपन्यांची भागीदारीची कवाडे खुली होणार आहेत. मोठी गुंतवणूक या क्षेत्रात येणार आहे.
मनोरंजन क्षेत्रात परिवर्तन आणण्यासाठी ते महत्वाचे ठरणार आहे. त्यादृष्टीने वेव्हज शिखर परिषद ही भविष्याच्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल आहे.
- हर्षवर्धन पवार,
जिल्हा माहिती अधिकारी,
अकोला
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा