डीएपी खतास पर्यायी खते वापरा कृषी विभागाचे शेतक-यांना आवाहन
डीएपी खतास पर्यायी खते वापरा
कृषी विभागाचे शेतक-यांना आवाहन
अकोला, दि. 14 : मृद परीक्षण व जमीन आरोग्य पत्रिकांच्या आधारे ‘एकात्मिक
अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली’ वापरण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. खरीप हंगामाच्या
अनुषंगाने डीएपी खताची शेतक-यांकडून जास्त मागणी होते. तथापि, शेतक-यांनी केवळ डीएपी
खतावरच अवलंबून न राहता इतर पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी
अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.
डीएपी खतामध्ये १८ टक्के नत्र, ४६ टक्के स्फुरद ही अन्नद्रव्ये आहेत.
डीएपी खताची कमतरता भरुन काढण्यासाठी पर्यायी खते वापरणे गरजेचे आहे. स्फुरद युक्त
खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी या खताची सर्वाधिक मागणी आहे. एसएसपी खत हे देशांतर्गत
तयार होत असून यामध्ये स्फुरद-१६ टक्के सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात.
सल्फर अन्नद्रव्यामुळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे.
डीएपी खताच्या एका गोणीऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी तीन गोणी खतांचा
वापर डिएपीस चांगला पर्याय आहे. एसएसपी बरोबरच संयुक्त खते जसे की एनपीके-१०:२६:२६,
एनपीके-२०:२०:०:१३, एनपीके- १२:३२:१६ व एनपीके-१५:१५:१५ या खतांच्या वापरामुळे नत्र
व स्फुरद बरोबरच पालाश हे अन्नद्रव्य सुध्दा पिकांना उपलब्ध होते. त्यामुळे या संयुक्त
खतांचा वापर केल्यास पिकांसाठी पोषक ठरतो.
त्याबरोबर, टीएसपी या खतामध्ये ४६ टक्के स्फुरद अन्नद्रव्याची मात्रा
असून डीएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व टिएसपी एक गोणी खतांचा वापर
केल्यास तो देखिल डीएपी खतास उत्तम पर्याय आहे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा