कुसुम सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

 

कुसुम सौर कृषीपंप योजनेचा

लाभ घेण्याचे आवाहन

 

अकोला, दि. 20 : प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान महाभियानात कुसुम योजनेंतर्गत सौर कृषी पंप योजनेच्या अर्जदारांनी प्रलंबित हिस्स्याची रक्कम भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

            सौर कृषी पंपाद्वारे दिवसा सिंचनाची सोय होते. शेतकऱ्यांना 3 ते 7.5 अश्वशक्तीचे सौर पंप उपलब्ध करून दिले जातात. सर्वसाधारण वर्गवारीतील लाभार्थ्यांसाठी कृषी पंपाच्या किंमतीच्या 10 टक्के, तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यांसाठी 5 टक्के हिस्सा भरण्याची तरतूद आहे.  केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान दिले जाते.

 

सन 2024-25 या वर्षात जिल्ह्यात 3 हजार 27 शेतकऱ्यांनी ऑनलाईन कोटेशन भरले आहे. 2 हजार 294 शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा भरला आहे. 1 हजार 923 सौर पंप आस्थापित करण्यात आले आहेत. संयुक्त सर्वेक्षणात 159 अर्ज रद्द झाले आहेत. 728 सौर पंप प्रस्तावित असून, कार्यवाही होत आहे. 

 

            योजनेसाठी शेतकऱ्याकडे विहीर, बोरवेल, शेततळे किंवा बारमाही जलस्रोत असणे आवश्यक. तसेच पारंपरिक वीज जोडणी नसलेले शेतकरी पात्र आहेत. अटल सौर कृषी पंप योजना-1 आणि 2 व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतलेला नसावा, असे लाभार्थी निवडण्याचे निकष आहेत.

शेतीचा सातबारा, आधारपत्र, बँक पासबुक, पासपोर्ट फोटो, अनुसूचित जाती, जमातीच्या अर्जदारांसाठी जातीचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे लागतात. प्रधानमंत्री/कुसुम योजना राज्य सरकारच्या महाऊर्जा या विभागामार्फत राबविण्यात येत आहे. महाऊर्जाच्या या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व ऑनलाईन नोंदणीसाठी http://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Componenet-B व www.mahaurja.com या संकेतस्थळाला भेट द्यावी व अधिक माहितीसाठी महाऊर्जा विभागीय कार्यालय, अमरावती दुरध्वनी क्र. ०७२१ २६६१६१० ई-मेल: domedaamravati@mahaurja.com वर संपर्क साधावा .

 

            तसेच शेतकऱ्यांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, तसेच लाभार्थी हिस्सा तातडीने भरावा, असे आवाहन महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी केले आहे.

 

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा