अकोल्याच्या तरूणाच्या लघुपटाची ‘कान्स’साठी निवड देशातून यंदा निवड झालेला एकमेव लघुपट

 


अकोल्याच्या तरूणाच्या लघुपटाची ‘कान्स’साठी निवड

देशातून यंदा निवड झालेला एकमेव लघुपट

अकोला, दि. ७ : अकोल्याच्या तरूणाने निर्माण केलेल्या ‘अ डॉल मेड अप ऑफ क्ले’ या लघुपटाची जगप्रसिद्ध कान्स चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. साहिल इंगळे असे या तरूणाचे नाव असून, ‘कान्स’साठी यंदा निवड झालेला हा देशातील एकमेव लघुपट आहे.

 

केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कोलकात्याच्या सत्यजीत रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये साहिल इंगळे ‘प्रोड्युसिंग फॉर फिल्म अँड टेलिव्हिजन’ या कोर्सचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. हा चित्रपट बंगाली भाषेबरोबरच युरोबा या नायजेरियाच्या भाषेत निर्माण करण्यात आला आहे. साहिल याची निर्मिती असून, इथोओपियाचा तरूण विद्यार्थी कोकोब गब्रवारिया टेस्फे याने दिग्दर्शन केले आहे.  

 

एक नायजेरियन तरूण खेळाडू भारतात फुटबॉलपटू म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी वडलांची शेती विकतो. त्याचे स्वप्न पूर्ण होण्यात येणारे अडथळे व प्रयत्न यांची ही कहाणी आहे. हा लघुपट २३ मिनीटे लांबीचा असून, चित्रीकरणासाठी केवळ इन्स्टिट्यूटची साधने वापरली. बाकी खर्च शून्य झाला. कुठल्याही आर्थिक मदतीशिवाय हा लघुपट पूर्ण झाला. इच्छा असेल तर अल्प साधनांतही चांगला चित्रपट निर्माण करता येतो, अशी प्रतिक्रिया साहिल याने व्यक्त केली.

 

आपण आधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून जनसंज्ञापन विषयात पदवी घेतली आहे. जनसंज्ञापनात चित्रपटाची ताकद काय असते, याची जाणीव झाल्यावर आपण चित्रपट शिक्षणाकडे वळलो. देशातील चित्रपट शिक्षण देणा-या संस्थांकडून आलेल्या २ हजार ७०० हून अधिक चित्रपटांतून केवळ १६ चित्रपटांची निवड झाली. लघुपट या श्रेणीत निवडला गेलेला आमचा देशातील एकमेव चित्रपट आहे, असे साहिल याने सांगितले. चित्रपट महोत्सवासाठी फ्रान्समध्ये जाण्यासाठी साहिल उद्या अकोला येथून रवाना होत आहे.  

०००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन