अन्न व मानके कायदा जिल्हास्तरीय सुकाणू समिती बैठक :कोविड रुग्णांना दिल्या जाणाऱ्या अन्नाची नियमित तपासणी करा-जिल्हाधिकारी पापळकर यांचे निर्देश

 


अकोला,दि. ९ (जिमाका)-  जिल्ह्यात कोविड बाधीत रुग्णांवर उपचार सुरु असतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच अन्य कोविड रुग्णालयात जेथे जेथे कोविड रुग्णांवर उपचार सुरु आहेत अशा सर्व ठिकाणी कोविड रुग्णांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या गुणवत्ता व दर्जाची तपासणी वेळोवेळी करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.

अन्न व मानके कायदा जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले,  डॉ. श्याम शिरसाम, सहायक आयुक्त अन्न सागर तेरकर तसेच पोलीस, नगरपालिका, मनपा विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सहायक आयुक्त अन्न यांनी माहिती सादर केली की,  जिल्ह्यात अन्न विषयक आस्थापनांच्या संख्येमध्ये वाढ झाली असून त्यात २९४७  आस्थापना ह्या वार्षिक १२ लाखांपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या आहेत तर १३ हजार ४३३ ह्या लहान आस्थापना आहेत. गेल्या वर्षभरात विक्री होणाऱ्या पदार्थांच्या अन्न दर्जा तपासणीसाठी आकस्मिक कारवाई करुन २१९ नमुने तपासणी केली. त्यात ७५ नमुने हे दर्जानुसार आढळले. तर १० नमुने हे निम्न दर्जाची आढळले.  यासंदर्भात ९ प्रकरणे प्रलंबित आहेत. भेसळयुक्त म्हणून जप्त केलेल्या मालाची किंमत ७ लाख ३५ हजार रुपय इतकी आहे,असेही सांगण्यात आले. प्रतिबंधित गुटखा प्रकरणी ४२ कारवाई करण्यात आल्या असून एक कोटी ७४ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ४२ प्रकरणी गुन्हे दाखल असून २८ जणांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.

या समितीचे उद्दिष्ट लोकांमध्ये सेवन करत असलेल्या अन्नाबाबत जनजागृती निर्माण करणे हे ही असून आपण घेत असलेल्या अन्न घटकांबाबतही लोकांनी जागरुक असावे याबाबत जनजागृती मोहिम राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले. तालुका व ग्रामिण पातळीवर नगरपालिका व तहसिलदार यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारीही त्यांनी  समितीकडे सादर कराव्या, जेणे करुन संबंधितांवर कारवाई करता येईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांना अन्न पदार्थांच्या दर्जाबाबत काहीही तक्रार असल्यास १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त तेरकर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ