प्राणवायुच्या पुरवठ्यासाठी प्रशासनाचे प्रामाणिक प्रयत्न

 


अकोला,दि.२७(जिमाका)-  जिल्ह्यात कोरोना विरुद्धच्या लढाईत ऑक्सिजन अर्थात प्राणवायुची नितांत आवश्यकता भासू लागली आहे. अर्थात याचे अनुमान असल्यानेच जिल्हा प्रशासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालयात तसेच मुर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजनचे युनिट उभारुन कार्यान्वित केले आहे. असे असले तरी मागणी आणि पुरवठा याचा ताळमेळ बसवतांना प्रशासन प्रामाणिकपणाने प्रयत्न करत आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार आणि त्यांचे सर्व सहकारी आरोग्य यंत्रणेच्या सहकार्यासाठी सज्ज असतात. शासनाने राज्यस्तरावर ऑक्सिजन पुरवठ्याच्या नियंत्रण व नियमनासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित केलेला असून आश्विन मुदगल हे या कक्षाचे प्रमुख संनियंत्रक अधिकारी आहेत.

अकोला जिल्ह्याच्या विचार करता शेजारील वाशीम आणि बुलडाणा या जिल्ह्यांना लागणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठाही अकोल्यातूनच केला जातो. त्याबाबतीत वाशीम जिल्हा पूर्णतः तर बुलडाणा जिल्हा अंशतः अकोला जिल्ह्यावर अवलंबून आहे.

याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सुरश्री गॅस या संस्थेकडे २० मेट्रिक टन इतक्या क्षमतेचे लिक्वीड ऑक्सिजन संयंत्र असून त्यातून सिलींडर मध्ये ऑक्सिजन भरुन तो पोहोचविण्याची व्यवस्था आहे. या शिवाय माऊली उद्योग या संस्थेकडे सहा मेट्रिक टन क्षमतेचे हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याची व्यवस्था आहे. या शिवाय पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या नियोजनानुसार जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ११ मेट्रिक टन, जिल्हा स्त्री रुग्णालयात १३ मेट्रिक टन तर मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात (आ.हरिश पिंपळे यांच्या निधीतून उभारलेले) १० मेट्रिक टन क्षमतेचे लिक्विड ऑक्सिजन संयंत्रे असून त्याद्वारे रुग्णालयातील रुग्णांची गरज भागविली जात आहे. तथापि या संयंत्रात लिक्विड ऑक्सिजन आणून भरावाच लागतो.

राज्य संनियंत्रण कक्षाच्या निर्देशानुसार जिल्हात दररोज पुणे आणि नागपूर येथून प्रत्येकी १० ते १५ मेट्रीक टन इतका लिक्विड ऑक्सिजन जिल्ह्याला मिळतो. रुग्णालयात सध्या दररोज १२ ते १५ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासते. आधीच्या साठ्याची स्थिती पाहून येणाऱ्या पुरवठ्याच्या वाटपाचे नियोजन करावे लागते. त्यासाठी प्रशासनाचे अधिकारी व रुग्णालयांचे व्यवस्थापन यांच्यात समन्वय, आवश्यक मागणीची नोंदणी त्यानुसार करावयाचा पुरवठा यासाठी अक्षरशः अहोरात्र प्रयत्न सुरु असतात. 

याव्यतिरिक्त जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्याचे संयंत्र बसविण्याचे, तसेच पारस येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील ओझोनायझेशन युनिट मधून ऑक्सिजन निर्मिती होते त्याचे शुद्धीकरण करुन सिलिंडर मध्ये भरता यावा यासाठी कॉम्प्रेसर बसविण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरु आहेत. त्यासोबतच स्थानिक अकोल्याचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी दिलेल्या एक कोटी रुपयांच्या आमदार निधीतून महापालिकेच्या दोन रुग्णालयात लिक्वीड ऑक्सिजनच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. आपत्तीच्या प्रसंगात जिल्हा ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्णतेच्या मार्गावर आहे.

प्राणवायुचे रसायनशास्त्र

ऑक्सिजन हा वातावरणात एकंदर घनफळाच्या २१ टक्के इतका असतो. सर्व सजिवांच्या श्वसनासाठी आवश्यक असणारा हा वायू प्राण वायू म्हणून ओळखला जातो, तो त्यासाठीच. पृथ्वीवरील  वनस्पती ह्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत कार्बन डाय ऑक्साईड वायु शोषून ऑक्सिजनचे उत्सर्जन करत असतात. त्यामुळे पृथ्वीवरचे ऑक्सिजनचे प्रमाण टिकून राहते.

ऑक्सिजन हा बहुतेक पदार्थांमध्ये संयोगस्वरुपात आढळतो. पदार्थांचे ऑक्सिडीकरण होण्याची प्रक्रिया म्हणजे ऑक्सिजनची संयोग प्रक्रियाच असते. उदा. लोखंडाचे गंजणे.

या मूलद्रव्याचा शोध इ.स. १७७४ मध्ये  शेले व प्रिस्टले यांनी स्वतंत्ररीत्या लावला. 

उत्पादन: 

(१) मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी मुख्यत्वे द्रवीकृत हवेचे ऊर्ध्वपतन करून ऑक्सिजन मिळविला जातो.  द्रवीकृत हवेचे नियंत्रित परिस्थितीत बाष्पन करून ९८ टक्क्यांहून अधिक ऑक्सिजन असलेला द्रव मिळतो. तो योग्य अशा भांड्यात किंवा त्याच्यावर दाब घालून सिलिंडरात साठवितात. त्यात जी थोडी अशुद्धी असते ती मुख्यत: आर्‌गॉनाची असते. ती सुद्धा आता आधुनिक तंत्रज्ञानाने दूर केली जाते. त्यासाठी झिओलाईट नावाचे मुलद्रव्य वापरले जाते.

 (२) विजेचा भरपूर व स्वस्त  पुरवठा असलेल्या देशांत निकेलाची विद्युत् अग्रे वापरून सोडियम हायड्रॉक्साइडाच्या विरल विद्रावाचे विद्युत् विच्छेदन करून काही थोडा ऑक्सिजन तयार केला जातो. धनाग्राशी ऑक्सिजन व ऋणाग्राशी हायड्रोजन विमुक्त (तयार) होतो.

या शिवाय प्रयोग शाळांमध्ये

पोटॅशियम क्लोरेटमध्ये मँगॅनीज डायऑक्साइड मिसळून ते मिश्रण तापवून त्याचे तापमान  ३००° से.  होण्याच्या आतच मँगॅनीज डायऑक्साइडाची उत्प्रेरक क्रिया होऊन ऑक्सिजन निर्माण होतो.  तसेच पोटॅशियम परमँगॅनेटाचे स्फटिक तापविल्यावर त्यांचे अपघटन होऊनही ऑक्सिजन मुक्त होतो.

गुणधर्म : ऑक्सिजन अतिशय क्रियाशील असून इतर कित्येक मूलद्रव्यांशी व संयुगांशी त्याचे संयोग होतात. विशेषतः ऑक्सिजन व ते पदार्थ एकत्र तापविल्यावर संयोग सुलभतेने होतात. कित्येक पदार्थ व ऑक्सिजन यांचा संयोग होण्याची प्रक्रिया अतिशय ऊष्मादायी असते. उद्योगधंद्यातील कित्येक प्रक्रियांत दगडी कोळसा, खनिज तेले व वायू यांच्या ज्वलनाने उत्पन्न होणाऱ्या उष्णतेचा उपयोग करून घेतला जातो. सजीवांच्या श्वसनात, लोखंडाच्या गंजण्यात व इतर नैसर्गिक प्रक्रियांत ऑक्सिजनच्या विक्रियेमुळे उत्पन्न होणारी उष्णता ताबडतोब भोवताली विखुरली जाते, त्यामुळे प्रत्यक्ष ज्वलन दिसून येत नाही. 

उपयोग:  शेकडो उद्योगधंद्यांत आवश्यक असलेली उष्णता, प्रकाश किंवा शक्ती यांची प्राप्ती खनिज तेले, दगडी कोळसा किंवा नैसर्गिक वायू (खनिज इंधन वायू) या इंधनांचे घटक ऑक्सिजनशी संयोग पावल्यामुळे होते. ऑक्सिजनाचा याशिवाय प्रत्यक्ष वापरही उद्योगधंद्यात मोठ्या प्रमाणात होतो. पोलाद बनविणाऱ्या आधुनिक कारखान्यात दररोज कित्येक टन ऑक्सिजन लागतो. अशा कारखान्यात हवेपासून द्रव ऑक्सिजनचे उत्पादन करणे श्रेयस्कर ठरते.

धातूचे वेल्डिंग व टर्निंग करण्यासाठी ऑक्सि-हायड्रोजन किंवा ऑक्सिॲसिटिलीन यांच्या ज्योतीचा उपयोग केला जातो. प्लॅटिनम, सिलिका व त्यांच्यासारखे पदार्थ वितळविण्यासाठीही या वायूचा उपयोग करतात. रॉकेट व क्षेपणास्त्रे उडविण्यासाठीही कित्येकदा द्रव ऑक्सिजनाचा इंधन म्हणून उपयोग केला जातो.

उंच ठिकाणी विरल हवेतील ऑक्सिजन श्वसनास कमी पडतो, म्हणून उंच पर्वतावर किंवा हवेत प्रवास करणाऱ्यांना ऑक्सिजनाचा पुरवठा करण्याची व्यवस्था असलेले मुखवटे वापरावे लागतात. पाण्याखाली काम करणाऱ्यांनाही असेच मुखवटे वापरावे लागतात. श्वसन नीट होत नसणाऱ्या रोग्यांना श्वसनासाठी ऑक्सिजन पुरविला जातो.

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे काय होते?

उंचावर गेल्याने ऑक्सिजनचा दाब कमी होतो. त्यामुळे गिर्यारोहक आदींना ही समस्या जाणवते. या शिवाय पाण्यात बुडणे, फुफ्फुसाला न्युमोनिया सारखे संसर्ग होणे इ. सारख्या स्थितीत ऑक्सिजन शोषण्याची क्षमता कमी होते. रक्तातील तांबड्या पेशींना हिमोग्लोबिन कमी पडल्याने, हृदय विकारामुळे रक्तप्रवाह मंदावून इ. कारणांनी ऑक्सिजन शरिरात कमी झाल्याने,मेंदूला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मनुष्य एकदम बेशुद्ध  होतो व नंतरही ऑक्सिजन न मिळाल्यास मृत्यू ओढवतो. ऑक्सिजन पातळी कमी होत गेल्यास प्रथम मन:स्थिती उद्दीपित आणि प्रफुल्ल होते, पुढे मनावरील ताबा सुटल्यासारखा होऊन निष्कारण ओरडणे, भांडणे वगैरे लक्षणे दिसतात. भूक नाहीशी होऊन वांत्या होतात, तहान लागते, थकवा लवकर येतो. हृद्‌स्पंदन जोराने व वेगाने होऊ लागून रक्तदाब काही वेळ वाढतो परंतु थोड्याच वेळानंतर हृदयाच्या कप्प्याचा विस्तार होऊन रक्तदाब कमी होतो.  त्वचा निळी होते, श्वास उथळ, वेगाने व जोराने चालून थोड्या श्रमानंतरही धाप लागते. मद्यातिरेकासारखी सर्व लक्षणे दिसतात. हृद्‌विकार अथवा वाहिनीरोधामुळे अशी न्यूनता उत्पन्न झाल्यास मूळ विकाराची लक्षणे दिसतात. 

साधारणपणे ६,००० मी. उंचीवर हवेतील ऑक्सिजनाचा दाब समुद्रसपाटीच्या दाबाच्या निम्मा असतो व त्यापुढे तो दाब कमी कमी होत जाते. म्हणून उंच प्रवास करणाऱ्या विमानामध्ये ऑक्सिजनाचा वायुदाब वाढविण्यासाठीच विशेष व्यवस्था करावी लागते अथवा मुखवट्यावाटे ऑक्सिजन पुरवावा लागतो.

(ऑक्सिजनच्या रसायन शास्त्र विषयक माहितीसाठी मराठी विश्वकोषातील नोंदींचा आधार घेण्यात आला आहे.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ