राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन कार्यक्रम: जिल्हा स्त्री रुग्णालयास राष्ट्रीय लक्ष्य मानांकन प्लॅटिनम ॲवार्ड: रुग्णांचा विश्वास संपादन करणे हाच खरा लौकीक- जिल्हाधिकारी पापळकर

 








अकोला,दि. १५(जिमाका)-  केंद्र शासनाच्या चमूने पाहणी करुन जिल्हा स्त्री रुग्णालयाला राष्ट्रीय लक्ष्य मानांकनाचे प्लॅटिनम ॲवार्ड मिळाले आहे. ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असून जिल्हा स्त्री रुग्णालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी हे अभिनंदनास पात्र आहेत,असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज काढले. रुग्णांचा विश्वास संपादन करणे हाच खरा लौकीक असून या विश्वासाची जपणूक करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,असे प्रतिपादनही जिल्हाधिकारी पापळकर यांनी यावेळी केले.

जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रसुती कक्ष व  शल्य गृह कक्ष यांची सन २०१९-२० मध्ये केंद्राच्या पथकाने पाहणी केली होती. त्यानंतर त्यास राष्ट्रीय लक्ष्य मानांकन प्लॅटीनम ॲवार्ड प्राप्त झाले आहे. या पुरस्कारात जिल्हा स्त्री रुग्णालयास सहा लक्ष रुपयांची रक्कम मिळाली आहे. या यशात सहभागी असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आज जिल्हाधिकारी पापळकर  यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिनाचे (दि.११ एप्रिल) औचित्य साधुन  गौरविण्यात आले. जिल्हा स्त्री रुग्णालयातील कस्तुरबा सभागृहात आयोजित या कार्यक्रमास  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, रुग्ण कल्याण समितीचे  पराग गवई,  स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसो यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रसुती कक्षातील गरोदर माता व नवजात शिशुच्या हृदयाचे ठोके तसेच गर्भाशयाच्या आकुंचन प्रसारणाची माहिती देणारे राष्ट्रीय दक्ष ॲप, स्त्री रुग्णालयाने तयार केलेल्या  ऑनस्पॉट माहिती देणारे  समता ॲपचे विमोचन ही जिल्हाधिकारी पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा स्त्री रुग्णालयच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. वंदना वसो, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. विजया पवनीकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. अर्चना फडके,  प्रशासकीय अधिकारी डॉ. राधा जोगी, अधिपरिचारिका सीमा बेंद्रे, औषधी निर्माण अधिकारी गणेश भडांगे, आहार तज्ज्ञ अंजली वाघ, मुकादम हरिश पवार, शिवचंद जयपिल्ले, हृषिकेश नाचणकर व अन्य  अधिकारी कर्मचाऱ्यांना सम्नान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार व अन्य मान्यवरांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या टिमचे कौतूक केले. सूत्रसंचालन डॉ. मेघना बगडीया यांनी केले. प्रास्ताविक डॉ. आरती कुलवाल यांनी तर आभार प्रदर्शन सीमा बेंद्रे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ