कोरोना रुग्णांसाठी पुरेशा खाटा, ऑक्सिजन व रेमडिसीवीर उपलब्ध रुग्णांनी घाबरु नये; मात्र जागरुक रहावे- पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू

 अकोला,दि.१० (जिमाका)- अकोला जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून कोविड बाधीत रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोना रुग्णांसाठी जिल्ह्यात पुरेशा खाटा उपलब्ध आहेत. आवश्यकता भासल्यास ऑक्सिजन व कृत्रिम श्वसन यंत्र संलन्ग खाटाही मुबलक आहेत. तसेच उपचारासाठी लागणारे रेमडीसिविर इंजेक्शन्सही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. रुग्णांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र असे असले तरी  लक्षणे जाणवताच चाचणी करणे व अहवाल पॉझिटीव्ह आल्यास तात्काळ रुग्णालयात दाखल होणे यात दिरंगाई करु नये, जागरुक रहावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे.

यासंदर्भात आपण पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील प्रशासकीय व आरोग्य यंत्रणांशी संपर्कात असून वेळोवेळी आढावा घेऊन अद्यावत स्थिती जाणून घेत आहे,असेही ना. कडू यांनी कळविले आहे. नागरिकांनी जागरुक राहुन स्वतःची व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी. नागरिकांनी घरातच रहावे, आवश्यक कामा व्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. मास्कचा सतत वापर करावा. परस्परांमध्ये अंतर राखावे व वारंवार हात साबणाने वा सॅनिटायझरने स्वच्छ करत रहावे, या त्रिसुत्रीचा वापर केल्यास आपण व आपले कुटूंबीय संसर्गापासून वाचू शकतो. घरातील वृद्ध, लहान मुले, गरोदर महिला यांची अधिक काळजी घ्यावी. घरातील सर्वांनी पौष्टिक आहार घ्यावा. हलका व झेपेल इतका व्यायाम, योगा प्राणायाम करावा. स्वतःचे व इतरांचे आरोग्य उत्तम राखावे, असे आवाहन ना. कडू यांनी जिल्ह्यातील जनतेला केले आहे. लक्षणे दिसताच तात्काळ कोविड चाचणी करुन शंका निरसन करावे. चाचणी पॉझिटीव्ह आल्यास जवळच्या कोविड रुग्णालयात भरती व्हावे,असे आवाहन ना. कडू यांनी केले.

आरोग्य यंत्रणेची सज्जता- डॉ. राजकुमार चव्हाण

याबाबत प्रभारी आरोग्य उपसंचालक  डॉ. राजकुमार चव्हाण यांच्याकडून तपशिलवार माहिती मिळाली ती याप्रमाणे-

डॉ. चव्हाण म्हणाले की, कोविड रुग्णांची विगतवारी तीन प्रकारात केली जाते. १) सौम्य लक्षणांनी युक्त रुग्ण, २)गंभीर रुग्ण व ३) अत्यवस्थ रुग्ण.

सौम्य लक्षणांनी युक्त रुग्णांना जर त्यांच्या घरी स्वतंत्र खोली (शौचालय व बाथरुम सह) असेल तर त्यांना गृह अलगीकरणात ठेवले जाते. अशी सोय नसल्यास त्यांना कोविड केअर सेंटर मध्ये निरीक्षणात ठेवले जाते. जिल्ह्यात असे आठ कोविड केअर सेंटर्स असून त्यात ६९५ खाटा उपलब्ध आहेत. त्यात ९६ रुग्ण सद्यस्थितीत भरती आहेत तर ५९९ खाटा रिक्त आहेत. आवश्यकता भासल्यास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी १०० खाटांचे व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात १००० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु करता येऊ शकते.

गंभीर रुग्णांना कोविड हेल्थ केअर सेंटर मध्ये उपचारासाठी ठेवले जाते. असे कोविड हेल्थ केअर सेंटर जिल्ह्यात १२ आहेत. त्यातील तीन शासकीय असून नऊ खाजगी आहेत. या कोविड हेल्थ केअर सेंटर मध्ये आवश्यकता भासल्यास ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असते. असे ५८६ खाटा जिल्ह्यात असून त्यातील ३६३ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. तर २२३ सद्यस्थितीत रिक्त आहेत.

अत्यवस्थ रुग्णांसाठी  अतिदक्षता विभागात उच्च दाब ऑक्सिजन पुरवठा सुविधा असणारी संयंत्रे व क्रृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रे संलग्न असतात.  असे कोविड हॉस्पिटल जिल्ह्यात ११ आहेत. त्यातील दोन शासकीय असून नऊ हे खाजगी आहेत. शासकीय रुग्णालयात अशा खाटा ११० असून खाजगी रुग्णालयात १०७ असे एकूण २१७ खाटा आहेत. या व्यतिरिक्त कृत्रिम श्वसन यंत्रणा हटवल्यानंतर केवळ ऑक्सिजन वर रुग्णाला ठेवता यावे यासाठी २५५ खाटा आहेत.  असे ऑक्सिजन सुविधा असणारे तब्बल ४७२ खाटा जिल्ह्यात उपलब्ध आहेत. सद्यस्थितीत २१७ आयसीयु खाटांपैकी १८२ खाटांवर रुग्ण आहेत तर ३५ रिक्त आहेत.

एकंदर जिल्ह्यात १७३४ खाटा असून ८४६ वर रुग्ण दाखल आहेत, तर ८८८ रिक्त आहेत, अशी माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.

 याव्यतिरिक्त जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे ५०, जिल्हा स्त्री रुग्णालयात ५० अशा १०० खाटांची अतिरिक्त सज्जता आहे. या सर्व खाटा या ऑक्सिजन पुरवठा सुविधेसह उपलब्ध असतील, असेही डॉ. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

ऑक्सिजन पुरवठ्याबाबत जिल्ह्याची स्थितीः-

जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १० किलोलिटर्स, जिल्हा स्त्री रुग्णालयात १३ किलोलिटर्स तर उपजिल्हा रुग्णालयांमध्ये १० किलो लिटर्स अशी लिक्वीड ऑक्सिजन संयंत्रे सज्ज असून त्यातून पुरवठा होत असतो. खाजगी रुग्णालयांना सात मेट्रिक टन व शासकीय रुग्णालयांना तीन मेट्रिक टन असा ऑक्सिजन हा सिलिंडर स्वरुपात पुरवला जातो. त्यासाठी जिल्ह्यात १७ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. थोडक्यात ऑक्सिजनची उपलब्धता मुबलक आहे,असा निर्वाळा डॉ. चव्हाण यांनी दिला.

रेमडीसिविर इंजेक्शन्स बाबतः-

सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयाकडे रेमडीसिविरच्या १५०० व्हायल्स उपलब्ध आहेत. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे १०१६ व्हायल्स अशा शासकीय यंत्रणेकडे २५१६ तर खाजगी रुग्णालयांकडे ९४२ व्हायल्स उपलब्ध आहेत. दररोज शासकीय रुग्णालयांत ६२ व्हायल्स वापर होत आहेत तर खाजगी रुग्णालयात २८२ व्हायल्स वापरल्या जातात, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

सध्या जिल्ह्यात अकोला शहरातील आयकॉन मेडिकल, व्हीएनआरएन मेडीकल, दत्त मेडीकल, वर्षामेडीकल,  ॲपल मेडिकल,  मैत्री मेडीकल, आरोग्यम स्वस्त औषधी, वननेस फार्मा, जाई मेडीकल,सूर्यचंद्र मेडीकल,केअर मेडीकल, आधार मेडीकल, येथे तर मुर्तिजापूर येथील अवघाटे मेडीकल व सुविधा मेडीकल या ठिकाणी रेमडीसिविर विक्री होत आहे, अशी माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.      

याबाबत अधिक स्पष्ट करतांना डॉ.चव्हाण म्हणाले की,  खाजगी डॉक्टर्स हे  रॅपिड ॲन्टीजेन वा आरटीपीसीआर चाचणी न करता थेट सिटी स्कॅनचा एचआरसीटी रिपोर्ट वरुन थेट रेमडीसिविरचा उपचार सुरु करतात, ही बाब अयोग्य आहे. रेमडीसिविरचा उपचार सुरु करण्याआधी रुग्णाची कोविड चाचणी करणे आवश्यक आहे असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

डॉ. चव्हाण म्हणाले की,  गेल्या महिन्यात जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढली होती. रुग्ण पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण हे दररोज ४५० ते ५०० पर्यंत पोहोचले होते.  मात्र या महिन्यात हा वाढीचा दर कमी झाल्याचे दिसून येते. सध्या पॉझिटीव्ह रुग्ण येण्याचे प्रमाण हे २५० ते ३०० पर्यंत आहे. पॉझिटीव्हीटीचा दर ११.६४ टक्के असून  मृत्यू दर हा १.६३ टक्के इतका आहे. पॉझिटीव्ह असणारे ९० टक्के रुग्ण हे कुठलेही लक्षण नसलेले वा सौम्य लक्षणांनी युक्त असे असतात. मात्र हे रुग्ण इतरांना संसर्ग करु शकतात, हाच खरा धोक्याचा मुद्दा आहे. एक तर या रुग्णांनी आपण स्वतःहून इतर कुणाच्या संपर्कात न येण्याची खबरदारी घ्यावी. ज्यांना घरी अलगीकरणात राहण्याची सुविधा असेल त्यांनी घरी राहतांना कुटूंबातील कुणाही व्यक्तीच्या संपर्कात येणार नाही याची खबरदारी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये. आपण इतरांना संसर्ग होण्यास कारणीभुत ठरू नये,असे आवाहन डॉ. चव्हाण यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ