एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प;केंद्र शासनाकडुन प्राप्त निधीतून राबवावयाच्या योजनांसाठी प्रस्ताव मागविले

 अकोला,दि. १५(जिमाका)-  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला यांना केंद्र शासनाकडून प्राप्त निधीतून योजना राबविण्यात येतात. तथापि,या योजनांमधील प्रस्तावित बदलांच्या मार्गदर्शक सुचनांना मंजूरी घेऊन योजना राबविण्यात येणार आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसुचित जमातीच्या इच्छुक लाभार्थ्यांकडून  प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

याबाबत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकोला यांनी माहिती दिली की,  केंद्र शासनाकडून प्राप्त निधीतून योजना राबविण्यासाठी  मंजूर योजनांचे वित्तीय मापदंड,  लक्षांक आणि अंमलबजावणीच्या पद्धतीत  प्रस्तावित बदल करण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सुचना  अपर आयुक्त आदिवासी विकास, अमरावती येथे सादर करण्यात आले आहेत.  या मार्गदर्शक सुचनांना मंजूरी मिळण्याच्या अधिन  राहुन योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांकडून  विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत.

योजनांची नावे-

अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्याच्या अस्तित्वातील विहीर बोअर करणे, वनोपज मालावर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण देणे,  दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्याच्या  जमिनीवर फुलशेती बाग लागवड करणे,  वनहक्क कायद्यांतर्गत लाभ दिलेल्या जमिनीवर  सपाटीकरण, बांध बंदस्ती, वनौषधी, औण वनोपज,  हॉर्टीकल्चर  प्लान्ट्स यांची कामे घेणे,  भुमिहिन आदिवासी मजूरांना  स्वयंरोजगारासाठी  प्रशिक्षण देऊन अर्थसहाय्य देणे,  आदिवासी महिला बचत गटांना  प्रशिक्षण देऊन व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणे,  गांडुळ खत, सेंद्रीय खत तयार करण्यासाठी प्रशिक्षण देणे,  युवकांना अग्निशमन व सुरक्षा विषयक प्रशिक्षण देणे.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या इच्छुक  लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज  प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला, न्यू राधाकिसन प्लॉट, माहेश्वरी भवन जवळ, महसूल भवन, अकोला येथे  सादर करावेत. हे अर्ज दि.१५ ते दि.३० पर्यंत  कार्यालयात कार्यालयीन वेळेत व कामकाजाच्या दिवशी  प्राप्त करुन भरुन द्यावेत. या योजनांच्या मार्गदर्शक सुचनांना  मंजूरी न मिळाल्यास प्राप्त अर्ज  रद्द करण्याचे अधिकार कार्यालयाकडे राखीव आहेत असेही प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ