शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव तात्काळ सादर करा- केंद्रीय राज्यमंत्री ना.संजय धोत्रे यांचे आढावा बैठकीत निर्देश


       अकोला, दि.(जिमाका)-  अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेताच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे सर्वेक्षण , पंचनामे आदी प्रक्रिया आटोपत आल्या असल्यातरी शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी परिपूर्ण व तृटीरहित प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश केंद्रीय  मानव संसाधन  विकास, कम्युनिकेशस आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान  राज्यमंत्री  ना. संजय धोत्रे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत दिले.
     या बैठकीस आ. गोपिकिशन बाजोरिया, आ. गोवर्धन शर्मा, आ. हरिष पिंपळे, आ. रणधीर सावरकर  यांच्यासह प्रभारी जिल्हाधिकारी  नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,  उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ तसेच सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
       प्रभारी जिल्हाधिकारी लोणकर यांनी  जिल्ह्यातील पिक नुकसानीच्या पंचनाम्यांची माहिती सादर केली. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पंचनामे पूर्ण झाले असून आता तालुका, उपविभाग व जिल्हास्तरावर  मदत प्रस्तावाची छाननी होऊन प्रस्ताव विभागस्तरावर दि. १३ रोजी पाठविला जाईल.
        यावेळी झालेल्या चर्चेत पिक विमा  क्षेत्रातील पंचनामे व त्यातील विमा परतावा मिळण्याबाबतच्या तांत्रिक बाबींवर चर्चा करण्यात आली. सर्व प्रस्ताव हे तांत्रिक अटींची पूर्तता करुन व परिपूर्ण पद्धतीने पाठवावे अशी सुचना ना. धोत्रे यांनी केली.
       या बैठकीत आगामी रब्बी हंगामाच्या पुर्वतयारीच्या दृष्टीने केलेल्या नियोजनाबाबतही चर्चा झाली. चर्चेच्यावेळी आ. रणधीर सावरकर, आ. हरिष पिंपळे, आ. बाजोरिया यांनी सहभाग घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ