पक्षीः निरीक्षण आणि ओळख
पक्षी सप्ताहानिमित्तः विशेष लेख
पक्षीमित्रा!आता गरज आहे इंटरनेट व मोबाईल
मधुन बाहेर पडून प्रत्यक्ष पक्षीजीवन पाहण्याची. पक्ष्यांचे फोटो मधुन
पक्ष्यांच्या रंगाचे व इतर माहितीनुसार जरी अगदी बारीक वर्णन मिळत असले तरी
प्रत्यक्षात हे सर्व रंग एकदम दिसणे शक्य नाहीत. पक्ष्यांचे रंग आपल्या नजरेला रंगसंभ्रमात
टाकणारे, त्याचे विविध रंग व रंगछटा व त्यांची जीवनपद्धती कोड्यात टाकणारी आहे.
त्यांच्या जीवनाच्या विविध पैलूंची जसे पक्ष्यांचे अन्न व अन्नव्यवस्था,
आश्रयस्थान, अश्रसाधनाचे प्रकार, स्थलांतर आणि सभोवतालच्या परिस्थितीशी नाते,
त्यांची समाजरचना. तसेच त्याचे मित्र व शत्रु पक्षी हे समजून व जाणून घेण्यासाठी
पक्षाचे निरीक्षणातून त्यांची ओळख करुन मैत्री करणे आवश्यक आहे.
सुरुवातीला आपल्या आजूबाजूचे व जवळपास
भागात मोकळ्या मैदानात वावरणाऱ्या पक्षांची ओळख करुन त्यांचे निरीक्षण करुन
त्यांची सवय ओळखता आले पाहिजे. पक्ष्यांची
एकदा ओळख झाली की मग ह्या छंदातून मिळणार आनंद काही वेगळाच आहे.
पक्षी पाहताना प्रथम नजरेत येणारा म्हणजे
त्याचा आकार उदा. चिमणी, मैना, कबुतर. नंतर नजरेत येतात ते अवयव. जसे चोच, डोके,
पंख व पाय इत्यादी पक्ष्याचा रंग व इतर. चोचीचा आकार व रंग, डोके त्यावरी पिसे,
तुरा इ. डोळाचा रंग, कडा, भुवया इ., पायाचा आणि पंजाचा आकार व रंग, शेपटीचा आकार व
वरील व खालील भागाचे रंग पिसे व तसेच मान, पाठ, पंखांचे वरील व खालील बाजुचे पिसे
व त्याची रचना व त्याशिवाय दिसणारे एखादे खास वैशिष्ट्य इतर अनेक लहान बारकावे जसे
हालचाली उदा. उड्या मारणे, उडण्याची पध्दत, बसण्याची जागा, जमिनीवर, झाडावर, जुनाट
खोडावर,झाडाच्या टोकावर, पाण्यावरील पर्चवर इत्यादी.
ज्यावेळी पक्षी नजरेत पडतो, त्यावेळी
पक्ष्याचे सर्वच गुण एकाच वेळी पाहणे सहज शक्य होत नाही. कारण कधीकधी पक्षी फारच
थोडा वेळ दिसतो किंवा इतर अडचणी मुळे पुर्ण दिसत नाही, तेव्हा जेवढे दोन-चार-पाच
अवयव दिसतात त्याची खात्रीपूर्वक नोंद घ्यावी. जेणेकरून ते पक्षी ओळखण्याच्या
दृष्टीने अधिक फायदेशीर ठरतात.
बऱ्याचदा पक्षी ओळखताना आकार व रंगसंगतीत
थोडफार घोटाळा होण्याची शक्यता असते. तेव्हा त्याचे रंग व इतर गुण जसे हालचाली,
बसणे, उडणे हे पक्षी ओळखण्याच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरतात.
क्वचितच बराच वेळ एकाच
ठिकाणी बसलेला पक्षी पाहण्याचा योग येतो, अशा वेळी पक्षाला आपली उपस्थिती न जाणवता
जेवढे जमेल तसे अवयवांचे निरीक्षण करावे.
सातत्याने पक्षीनिरीक्षण करताना आवाजा
वरूनही पक्षी ओळखता येतात. तसेच नर व मादी या दोघातला फरक लक्षात येतो. विणीच्या
हंगामात नरात होणाऱ्या पिसात रंगाचे व आवाजाच्या सुरात होणारे बदल पण लक्षात
येतात.
पक्षी निरीक्षणाला वेळ व काळाचे बंधन नसले
तरी आजुबाजुच्या परिस्थितीचे भान ठेवून आपली उपस्थिती न जाणवता पक्षाला आपल्या कडुन कोणत्याही प्रकारे त्रास
होणार नाही तसेच आधिवासाचे नुकसान होणार नाही ही काळजीघेणे जरूरी आहे.
-देवेंद्र तेलकर, अकोला.
(लेखक पक्षी अभ्यासक
आहेत.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा