पक्षी सप्ताहानिमित्तः विशेष लेख- पक्षांची आंघोळ

 


      दिवसातला बराचसा काळ पक्षी चोचीने पिसे साफसुफ करतांना दिसतात. चोचीने साफसफाई करता येणार नाही अशा डोक्यावर व कानाचच्या जवळपासचा भाग  पायांनी खाजवुन त्या भागाची  साफसफाई करतात त्याच बरोबर पिसे व्यवस्थित करतात. याशिवाय दिवसातुन बऱ्याचदा गरजे प्रमाणे जलस्नान, सुर्यस्नान, धूलिस्नान शिवाय कधीकधी मुंगी-स्नान करुन पक्षी शरीराची निगा राखतात.

 

 जलस्नान: जवळजवळ सर्व प्रजातीचे पक्षी दररोज पाण्याने आंघोळ करतात. असे करताना संपूर्ण शरीर भिजेल याची ते काळजी घेतात. त्यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या हालचाली ते करतात. विविध पक्ष्यांची आंघोळ करण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळी असते असे दिसून येते.

         सर्वात जास्त प्रकारचे पक्षी उथळ पाण्यात बसुन किंवा उभे राहून पंखांनी अंगावर पाणी उडवुन आंघोळ करतात. उदा. चिमण्या, कावळे, बुलबुल, दयाळ (रॉबिन), साळुंकी (मैना), माशिमार (फॅनटेल फ्लायकॅचर),खाटीक, सुभग, कावळे, शिक्रा सह शिकारी पक्षी इतर बरेच पक्षी उथळ पाण्यात बसुन किंवा उभे राहून पंखांनी अंगावर पाणी उडवुन आंघोळ करतात.

    काही पक्षी जसे कोतवाल, वेडाराघु, नाचण, माशिमार (फ्लायकॅचर) मोनार्क, धिवर (किंगफिशर) निळपंख  सुद्धा पाण्यात वरुन उडी मारून वरच्यावर डुबकी मारतात असे अनेकदा करतात या उलट स्वर्गीय नर्तक नराची शेपटी खूप लांब असल्याने शेपटीला पाण्याचा स्पर्श न होवु देता पाण्यात वरच्यावर सुर मारून बाहेर पडतात. तर त्याच प्रमाणे भिंगऱ्या पंकोळया फक्त पाण्याला स्पर्श करुनच अंघोळीचे ऐदीसमाधान करुन घेतात

    ‘चिखलपायटे’ पक्षी (वेडर्स), उदा. चिखल्या, शेकाट्या, तुतारी, टिलवा आणि पाण्यातच पोहणारी वन्य बदके टिबुकली, तसेच पाणकावळे करकोचे  पाणकोंबड्या, कमळपक्षी, फटाकडी  हे पाण्यात भरपूर वेळ देऊन पाण्याचा खेळताखेळता आंघोळीचा आनंद घेतात. नंतर बाहेर येवून उन्हाचा आनंद घेतात.

सुर्यस्नान (सनबाथ)- थंडीच्या दिवसांत (सनबाथ अथवा बास्किंग) राघू, शिंजिर, हरियाल, खबुतर, धनेश, शिकरा खाटीक वटवट्या व इतर बर्‍याच प्रजातींचे पक्षी सूर्यस्नानाच्या प्रेमात पडले दिसतात. सूर्याची पहिली किरणे पडली की हे पक्षी झाडाच्या उंच फांदीवर व विद्युत तारांवर बसून हे पक्षी दोन्ही पंख उघडून व पाठीवरील पिसे फुलवुन पिसे साफसूफ पण करताना दिसतात सूर्यकिरणांशी काटकोन करून बसून राहतात. जेणेकरून सूर्याची कवळे किरणे पिसांमधून त्वचेपर्यंत पोचतील असे बसून सूर्यकिरणांमुळे शरीराचे तापमान नियंत्रित करत जेणे करुन पिसांचे निर्जंतुकीकरण होते त्याच थंडीत ऊब मिळवून तरतरी येते.

धूलिस्नान- वेडाराघू,धनेश, हुदहुद, चिमण्या, लावा, तित्तर, सारखे इ. पक्ष्यांना धूलिस्नान फार प्रिय आहे. त्यांच्या शरीरातील तैल ग्रंथीमधून निघणारे स्त्रावाच्या चिकटपणाने उडताना बाधा निर्माण होऊ नये यासाठी पिसांमधील तेल वेळोवेळी काढून टाकणे गरजेचे असते. त्याकरिता पक्षी जमिनीवर धूळ (बारीक माती) असेल अशा ठिकाणी धूलिस्नान घ्यायला जमतात. एकामागून एक मातीत लोळून संपूर्ण पिसारा धुळीत घुसळवून घेतात. त्यामुळे पिसांना लागलेले तेल धूळ शोषून घेते व पिसे कोरडी होते. धुलस्नानाने पक्ष्यांना अनेक प्रकारच्या रोग जंतूंपासून मुक्तता मिळवण्यासाठी धूलिस्नानाचा उपयोग होतो. जास्त करुन संध्याकाळी पक्षी धुलस्नान करताना दिसतात.

     स्नान घेतल्या नंतर सुरक्षित ठिकाणी बसून स्वतःच्या पिसांची साफसुफ करुन पिसांची घडीसुद्धा नीटनेटकी करत स्वतःच्या शरीराची योग्य ती काळजी घेतात. तसेच एकमेकांची पिसे साफ करून देण्यात मदत करतात. त्यामुळे मैत्री-प्रेमभावना-एकी सुद्धा टिकून राहते.

    पक्षांचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी झाडे, पाणी शिवाय मातीही तितकीच जरुरी आहे आणि हे टिकून ठेवणे आपली नैतिक जबाबदारी आहे.

-देवेंद्र तेलकर, अकोला.

लेखकःवन्यजीव अभ्यासक आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ