विशेष लेख- सकस दुध उत्पादन आणि अन्नसुरक्षा


         प्राचीन काळापासून मानवाने विविध पाळीव पशुंच्या दुधाची अन्न म्हणून उपयुक्तता आणि पुढे  मानवाच्या विकासानुसार दुध-दुग्धजन्य पदार्थांच्या माध्यमातून समाजाची अन्न सुरक्षाही साधली गेली. मानवाच्या प्रगतीनुसार दुध व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती हा प्रमुख पशुधन उद्योग म्हणून जगभर आकाराला आला. भारतातही दूध उत्पादन व विक्री हा ग्रामीण, निम शहरी आणि मोठ्या शहरातून पशुपालकांचा प्रमुख रोजगाराभिमुख व्यवसाय झाला. मात्र वाढत्या स्पर्धेच्या युगात  दुधात भेसळ आणि अस्वच्छपणे दूध निर्मिती  होवू लागली आहे परिणामी, मानवी आरोग्याच्या समस्यांही निर्माण झाल्या आहेत. शेतकरी आणि पशुपालक हे प्रमुख दूध उत्पादक घटक असल्याने  त्यांच्यात मानवी  अन्नसुरक्षेच्या दृष्टीने सकस दूध उत्पादन कसे करावे याविषयी माहिती देणारा खास लेख…..

                दुध उत्पादन गुणधर्मामुळेच गायींना वैदिक काळात आर्थिक सुबत्तेचे प्रतिक मानल्या गेले आहे. आजच्या वैज्ञानिक युगात आपल्याला दुधातील प्रथिने, स्निग्धांश, शर्करा, जीवनसत्वे, खनिजद्रव्ये इत्यादी पोषण घटकांचा परिचय झालेला आहे. झपाट्याने वाढत चाललेल्या मानवी लोकसंख्येस प्रथिनांची गरज मोठ्या प्रमाणावर लागते आहे आणि म्हणून प्राणीजन्य प्रथिनांचा स्त्रोत म्हणून दुधास पहिल्या जाते. वनस्पतीजन्य प्रथिने (डाळ, कडधान्य) यांच्या उपलब्धता आणि किमतींचा विचार केल्यास, प्राणीजन्य प्रथिने (दुध, अंडी, मांस) हे अधिक सुलभ आणि स्वस्त पर्याय ठरतात. म्हणूनच दुधाची असलेली दैनंदिन गरज नेमकेपणाने ओळखून दुध व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती हा प्रमुख पशुधन उद्योग म्हणून जगभर आकाराला आला आहे.

दूध एक सकस आहार

              गायींच्या बरोबर दूध निर्मिती क्षेत्रात म्हशींचे योगदान लक्षणीय किंवा काकणभर सरसच आहे. भारतात म्हशींच्या संख्येचा विचार केल्यास एकूण दूध निर्मितीतील म्हशींचे महत्वपूर्ण योगदान लक्षात येईल. मुर्रा, सुरती, जाफराबादी, मेहसाना सारख्या उत्तम दूध देणार्‍या म्हशींच्या जाती भारतात आहेत. सर्वाधिक पशुधंनसोबत एकूण दूध उत्पादनात (सुमारे 133 दसलक्ष मेट्रिक टन) जगात भारताचा प्रथम क्रमांक आहे. संख्येने मोठ्या पशुधंनामुळे हे चित्र दिसत असले तरी, मात्र देशी गायी म्हशींचे दरडोई दूध उत्पादन कमी आहे. त्यातुलनेत जर्सी, होल्स्टेन फ्रिजियन सारख्या विदेशी वंशाच्या गायींचे दूध उत्पादन क्षमता अधिक आहे.

      म्हशीच्या दुधात गायींपेक्षा स्निग्धाचे प्रमाण अधिक आढळते. शेळीच्या दुधातील स्निग्धबिन्दु गाईम्हशींच्या स्निग्धबिंदूपेक्षा  आकाराने लहान/सूक्ष्म असल्याने लहान बालकांना पचायला सुलभ असतात. गायींच्या दुधात मानवी दुधाच्या तुलनेत शर्करेचे प्रमाण कमी असल्याने साखर टाकून गायींचे दूध लहान मुलांना पिण्यास दिल्यास ते आवडीने पितात. दुधातील अ, , , क आणि  ब वर्गीय जीवनसत्वे विविध आजारांना प्रतिकार करतात. कॅल्शियम, मंगनीज, पोटॅशियम, सेलेनियम, जस्त / झिंक यांसारखे खनिजद्रव्ये हाडांची बळकटी करतात

      दूध उत्पादनात भारतीय वंशाच्या गायींची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी सत्तरच्या दशकात संकरीकरणाचा अवलंब केल्या गेला. भारतात अनेक राज्यात, सहकारी तत्वावर दूध संकलन आणि प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर उभे राहिलेत. गुजरातमध्ये डॉ. वर्गीस कुरियन यांचे मार्गदर्शनाखाली ‘अमूल’ या सहकारी दूध संघाने नामवंत ब्रॅंड म्हणून रूप धरण केलेले आहे. भारतात वर्ष 2001 पासून डॉ कुरियन यांचा 26 नोव्हेंबर  हा जन्मदिन राष्ट्रीय दूध दिन म्हणून साजरा केल्या जातो. महाराष्ट्रात देखील गोकुळ, वारणा, महानंद, चितळे यांसारख्या अनेक समुहांनी या क्षेत्रात क्रांतिकारक कामगिरी केलेली आहे.

पशूंच्या दुधातील घटक पदार्थ

               सर्वच सस्तन प्राण्यांनी पिल्लांना जन्म दिल्यावर त्यांचे भरणपोषण करण्यासाठी आपल्या स्तनग्रंथीद्वारे स्निग्ध, प्रथिने, शर्कश, खनिजे इ. अनेक घटकांनी युक्त पांढरा पातळ स्त्राव स्त्रवतो यालाच आपण दुध म्हणतो. दुधातील घटक पदार्थांचे प्रमाण प्राण्यांची प्रजाती, जाती, वय, वेत अवस्था, पोषण, आरोग्य इ. अनेक बाबींमुळे कमी अधिक स्वरूपात बदलत असते. दुधातील सर्व घटक पदार्थांचे प्रमाण नेहमी एकसारखे नसते. अनेक कारणांनी घटक पदार्थ बदलतात.  पर्यायाने दुधाचे पोषण मूल्य आणि बाजारभाव देखिल बदलतो. दुधातील स्निग्ध, प्रथिने तथा शर्करा इ. चे प्रमाण जनावरांच्या प्रजाती, जाती, वय, दुग्धोत्पादनाची अवस्था, दोन दोन्हातील अंतर, कांसेतील फरक, व्यायाम, माज, ऋतूमान, पोषण, आजार, औषधोपचार, शारिरीक व्यंग, पाणी, हवामान इ. अनेक घटकांमुळे बदलत असते. पशुपालकांना दुधातील या विविध घटक पदार्थांचे ज्ञान असणे म्हणूनच आवश्यक ठरते.

 

                          दुधामध्ये मुख्यतः दोन प्रकारचे घटक पदार्थ आढळतात

 

·   मुख्यघटक- पाणी, प्रथिने (Proteins), स्निग्धपदार्थ (Fat), शर्करा (Lactose), अस्निग्ध घनपदार्थ (SNF), खनिजपदार्थ (Minerals)

·    इतर घटक –संप्रेरके (Enzymes), प्रथिनरहीत नत्रयुक्त पदार्थ (NPN), जीवनसत्त्वे (Vitamins), रंगद्रव्ये, विद्राव्यवायु इ.

सकस दूध उत्पादनाची दशसूत्री

      निसर्गत: मिळणारे दूध हे पूर्णतः स्वच्छ आणि सकस असते. मात्र निर्मितीपासून दुधाच्या सेवनपर्यंत बरेचदा दूध काढणारे गवळी/ दूध दोहन मशीन, दुधाचे संकलन करण्याची भांडी, दूध वाटप करताना होणारी वाहतूक, दुधातील भेसळ अशा अनेक गोष्टींमुळे दूध अस्वच्छ होते आणि पिण्यायोग्य राहत नाही. योग्य तापमानास दूध साठवून न ठेवल्यास दुधाचा सकसपणा कमी होतो. मानवी आरोग्याचा विचार करता, सकस दूध उत्पादन करण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे ती खालील प्रमाणे.

1.  गोठ्याची स्वच्छता – सकस दूध उत्पादनाचा गोठा हा आरंभबिन्दु असतो म्हणून गोठ्याची सर्वकष स्वच्छता ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. दूध काढण्यापूर्वी दुग्धशाळा स्वच्छ करून घ्यावी. दूध काढण्याअगोदर त्या जागेवर जंतुनाशक द्रावण असलेले पाणी शिंपडून घ्यावे. शक्य नसल्यास स्वच्छ पाणी शिंपडून धूळ उडणार नाही याची काळजी घ्यावी.

2.  पशूंची स्वच्छता – दूध काढण्यापूर्वी कांस स्वच्छ धुणे आणि कोरड्या स्वच्छ कापडाने पुसणे. दूध काढल्यानंतर जनावरांची सडे निर्जंतुक पाण्यात किंवा जंतुनाशक द्रावणात बुडवून घ्यावे जर दूध काढल्यानंतर जनावरांना किमान 20 मिनिटं खाली बसू देऊ नये दूध काढल्यानंतर सरांची छिद्रे 15 ते 20 मिनिटांपर्यंत उघडी राहतात यामुळे अपायकारक रोगजंतूंचा या छिद्रातून प्रवेश होत जंतुसंसर्ग होण्याची दाट शक्यता असते अशा जंतूंचा संसर्ग झाल्यानंतर संबंधित जनावरांना कासदाह किंवा स्तनदाह होण्याचा धोका असतो.

3.  पशू आरोग्य तपासणी - दुधाळ पशूंच्या स्तनदाहची तपासणी करणे

4.  दूध काढणारे गवळी – स्वच्छ, नीटनेटके, निर्व्यसनी, निरोगी असावेत. त्यांना क्षयरोग नसावा. दूध काढणारा व्यक्तीच्या तळहाताला जखमा असू नये. दूध काढण्यापूर्वी संबंधित व्यक्तीने आपले हात जंतुनाशक द्रावणाचा वापर करत किंवा साबणाच्या साह्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत त्यानंतर स्वच्छ धुतलेला टॉवेल किंवा सुती कापडाने कोरडे करून घ्यावे.

5.  दूध काढण्याची पद्धत – पूर्ण मूठ पद्धतीने दूध दोहन करावे यामुळे सडांवर अतिरिक्त भार पडणार नाही. अंगठा दुमडून दूध काढू नये. दूध काढण्याची क्रिया ही साधारणतः पाच ते सात मिनिटात पूर्ण करून घ्यावी कारण दूध देणे ही मानसिक क्रिया असून ऑक्सिटोसीन नावाच्या संप्रेरकामुळे होत असते आणि या संप्रेरकाचा प्रभाव हा केवळ पाच ते सात मिनिटापर्यंत असतो.

6.  दूध दोहन यंत्र – जनावरे अधिक दूध उत्पादन देणारी किंवा संकेत अधिक  असल्यास मिल्किंग मशीनद्वारे दूध काढणे अधिक सोयीचे आणि उत्तम, परंतु मिल्किंग मशीन ची स्वच्छता ही ठेवणे तेवढेच महत्त्वाचे असते.

 7.       दुधाची भांडी – दूध काढताना वापरण्याची भांडी, संकलनाची भांडी, शक्यतो स्टीलची आणि अरुंद गळा असणारी असावीत, वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर विसळणे, धुणे, निर्जंतुकीकरण करावे.

8.         दूध संकलन – पाश्चरायझेशन करताना 100 डिग्री सेल्सियस वर तापविणे आणि थंड करणे, यामुळे जिवाणू मरतात आणि दुधाची साठवण क्षमता वाढते.

9.         दुधात भेसळ करणे टाळा – अनेकदा जास्त पैसे कामावण्याच्या मोहाने काही दूध उत्पादक दुधात पीठ, पाणी मिसळवितात मात्र ही भेसळ लक्षात आल्यावर ते ग्राहकांचा विश्वास गमावून बसतात आणि कायमस्वरूपी व्यवसायात नुकसान सोसतात. आज दुधातील भेसळ ओळखण्याच्या अनेक चाचण्या सहजपणे करता येतात.

10.       दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया व पॅकेजिंग – योग्य प्रक्रिया पद्धतीचा अवलंब आणि ठराविक प्रकारच्या मानक दर्जाचे पॅकेजिंग साहित्य वापरुन दुधाचे वितरण करावे जेणेकरून दुधाची सकसता कायम राहील

 

                                   डॉ. प्रवीण बनकर, डॉ. गिरीश पंचभाई आणि  डॉ. स्नेहल पाटील   

                                   सहाय्यक प्राध्यापक, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला

                                   3- पशुधन विकास अधिकारी तालपसचि, बार्शीटाकळी जिल्हा अकोला

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ