चला निर्माण करूया, आपल्या अंगणात पक्षी अभयारण्य





       पक्षी हा निसर्गातील अविभाज्य घटक आहे. एरवी अभयारण्यात दिसणारे हे पक्षी आपल्या अंगणात येतील हे कदाचित दिवास्वप्न ठरेल असे वाटेल मात्र, असे मुळीच नाही. आता आपल्या घरासमोरील अंगणातही हे प्रती अभयारण्य उभारता येते हे ऐकूण आपणास आश्चर्य वाटू नये. काही महत्वपूर्ण कृती अंमलात आणल्या तर आपल्या अंगणातही पक्षी अभयारण्य कसे उभे राहील याची माहिती देणारा हा विशेष लेख… 

 

       पक्षी अभयारण्य म्हटलं कि डोळयासमोर येते घनदाट वृक्षराजी, तलाव, विस्तीर्ण गवताळ/पाणथळ प्रदेश व त्यात विहार करणारे विविध पक्षी. मग मनात विचार येतो की हा अनुभव मला माझ्या अंगणात / शहरात घेता आला तर. तुमचे हे स्वप्न पण नक्की साकार होऊ शकते फक्त योग्य ती कृती करा मग पहा आपल्या अंगणात पण 15ते 20 प्रकारच्या पक्ष्यांचा राबता नेहमी राहील.

                          पक्षी अभयारण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी

 

      चला तर पाहूया पक्षी अभयारण्यासाठी कोणत्या गोष्टी पाहीजे. 1) अंगणात स्थानिक प्रजातींची झाडे लावा. उदा. अमलताश, पळस, पंगारा, कडुनिंब, गोडनिंब, लिंबू, आंबा, बेल, पेरू, जास्वंद, तगर इ. झुडूप प्रजातीमध्ये काटेकोरांटी, अबोली, पानपुटी, दुधमोगरा इ. वेलींमध्ये विविध फळ भाज्या सोबत फुलांसाठी जाई-जुई, चमेली, रातराणी इ.2)अंगणात सर्वत्र कॉंक्रीटीकरण करू नका , आवश्यक त्या भागामध्ये पेव्हर्स कींवा परश्या लावा . जास्तीत जास्त भागात माती कशी राहील याचे नियोजन करा व या मातीवर अंगणातील झाडांचा पाला-पाचोळा मोठ्या झाडांच्या मुळाशी पसरवून ठेवा जेणे करून उन्हाळ्यात ओलावा राहील व त्याचेच खत तयार होईल. या वाळलेल्या पाचोळ्यातच लहान किडे-गांडूळ तयार होवून पक्ष्यांना खाद्य उपलब्ध होते. तसेच चिमणी, वेडाराघू इ. पक्ष्यांना धुळ आंघोळीची सवय असते त्यासाठी त्यांना बारीक माती आवश्यक असते.

 

      ही प्रक्रिया इथेच थांबली नाही बर का !  अजून जाणून घेवूया अंगणातील अभयारण्यासाठी लागणाऱ्या बांबीविषयी. 3) एका ठराविक ठिकाणी पाण्यासाठी पसरट मातीचे भांडे बाराही महिने ठेवा. लोकांचा एक गोड गैरसमज आहे की पाण्याचे भांडे फक्त उन्हाळ्यातच ठेवायचे. हे भांडे नेहमी स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी. ज्या प्रमाणे आपल्याला पिण्यासाठी व आंघोळीला स्वच्छ पाणी लागतं. त्याच प्रमाणे पक्ष्यांनासुध्दा स्वच्छ पाणी लागतं. हे भांडे एकाच ठिकाणी ठेवले तर पक्ष्यांना त्याची सवय होते व ते बरोबर त्यांच्या ठरलेल्या वेळेवर पाणी पिण्यासाठी व आंघोळीसाठी येतात. तसेच झाडांना मुळाशी पाणी घालतांना त्या झाडांच्या पानांवर पण पाणी शिंपडा जेणे करून पानांवरील धुळ निघून जाईल व पानं स्वच्छ होतील शिवाय शिंजीर व शिंपी या प्रजातीचे पक्षी या पानांवर पडलेल्या पाण्याच्या थेंबावर आपले अंग घुसळून आंघोळ करतात, तर चिमणी , मैना, साळुंकी, दयाळ व बुलबुल या सारखे पक्षी पाण्याच्या भांड्यात डुंबत डुंबत यथेच्छ पाणी उडवत आपली आंघोळ करतात.

 

                            पक्ष्यांना असे मिळेल नैसर्गिक खाद्य

 

      पक्ष्यांना नैसर्गिक खाद्य कसे उपलब्ध होईल याचा विचार करा. त्यांना एकाच प्रकारचे धान्य किंवा उरलेले अन्न देऊन त्यांना आळशी बनवू नका. निसर्गाने प्रत्येक पक्ष्यावर एक जबाबदारी दिली आहे. त्यामध्ये हस्तक्षेप करू नका. आयते अन्न दिल्यामुळे कबुत्तर व बुलबुल सारख्या पक्ष्यांची प्रजाती वाढतं आहे. त्यामुळे भविष्यात वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात. अंगणात जर छोटा खड्डा तयार करून त्यात पाला-पाचोळा घरातील उरलेले अन्न टाकून ठेवले तर चांगले कंपोस्ट खत तयार होते. शिवाय अंगणात रासायनिक खतांऐवजी जीवामृत, शेण-गोमुत्र व जैविक खताचा वापर केला तर पक्ष्यांना नैसर्गिक अन्न सहज मिळेल.

 

            चिमणी, चिरक व दयाळसारख्या पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटे तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवर किंवा उंच झाडांवर लावू शकतात. आपल्या परिसरात मोठी झाडे लावणे शक्य नसेल तर शिंपी पक्ष्यांसाठी तुम्ही रंगाच्या बादलीत वड, पिंपळ, जांभुळ , रामफळ , सिताफळ व औंदुबर सारखी झाडे लावावीत व ते 3-5  फुटा पर्यंत वाढवावी त्यांची मुळे जमिनीत जाणार नाही याची काळजी घ्यावी. मग हे झाडे मोठे मैदान, मंदिर/शेती परिसरात लावावीत किंवा वृक्षा रोपणासाठी द्यावी. या काळात या झाडांच्या पानं शिवून हे पक्षी आपले घरटे बनवितील व या झांडामुळे आपला परिसर नेहमी हिरवागार दिसतो.वरील सर्व मुद्दे हे मी माझ्या पक्षी अभयारण्यातील निरीक्षणातून नोंदविलेले आहे.

 

                               माझ्या अभयारण्यात येणाऱ्या पक्षांविषयी

 

            माझे पक्षी अभयारण्य हे शहराच्या मध्यभागी असून आजुबाजुला सिमेंट क्रॉंक्रीटचे जंगल वाढतच आहे. त्यामुळे आज विविध पक्ष्यांना माझे आंगण एक आश्रय स्थान झाले आहे़. आज माझ्या पक्षी अभयारण्यात चिमणी, मैना , साळुंकी, किर पोपट, कंठा पोपट, पंचरंगी पोपट, कावळा, दयाळ, बुलबुल, सातभाई, चिरक, डव, शिंपी, राखी वटवट्या, काळा आवक, शिंजीर, धनेश, हरियल, कोतवाल , सुभग, तांबट, कोकीळ , भारद्वाज, माळमुनिया, वेडाराघू, गायबगळा, भुरा बगळा इ. पक्षी नियमित येतात. नवरंग, स्वर्गीय नर्तक, काळा थिरथिरा, चातक, पावश्या, पळस मैना, खाटीक, टकाचोर, हळद्या, काळपाठी सुतार, टिकेलचा माशीमार, हुप्पु, काळ्या मानेचा करकोचा, पाण कोंबडी, टिटवी, किलकिले , नीलकंठ, चष्मेवाला, सुगरण, धोबी इ. पक्षी अधुन-मधुन दर्शन देतात.

           शहरातील प्रत्येक अंगणात व बगीच्यामध्ये जर वरील प्रमाणे उपाय केले व स्थानिक प्रजातींच्या झाडांचे वृक्षारोपण व संगोपन केले तर पक्षी संवर्धनासाठी मोलाची मदत होईल. चला तर आज पक्षी सप्ताहाच्या समारोपानिमित्त प्रत्येक अंगणात पक्षी अभयारण्य निर्माकरण्याचा संकल्प करून पक्षी व पर्यायाने पर्यावरणाचे संरक्षण करूया व भावी पिढीसाठी सुंदर जग निर्माण करूया.

 

                                                                   अमोल सावंत,

                                                                   लेखक, वन्यजीव अभ्यासक आहेत.

                                                               ०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ