प्राणी क्लेष प्रतिबंधक समिती ; लम्पिपासून बचावासाठी जनावरांना द्या योग्य शुश्रूषा व पौष्टिक आहार-पशुवैद्यकांचा सल्ला गुरांना मोकाट सोडू नका- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन





अकोला,दि.१५(जिमाका)- लम्पि या संसर्गजन्य आजारापासून बचावासाठी पशुपालकांनी आपल्या जनावरांची नियमित शुश्रूषा करणे आवश्यक असून त्यासोबतच त्यांची प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी प्रथिनयुक्त पौष्टिक आहार द्यावा, असा सल्ला पशुवैद्यकांनी दिला आहे. पशुवैद्यकांच्या सल्ल्याचे पालन पशुपालकांनी करावे,आपल्या गुरांना मोकाट सोडू नका,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. तसेच गुरांना मोकाट सोडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान लम्पि मुळे जिल्ह्यात १६२२ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यापैकी ९१३ जनावरांच्या पालकांना २ कोटी २६ लक्ष ३८ हजार रुपयांचे अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले आहे. उर्वरित  मदतीचे वितरण प्रक्रिया प्रगतीपथावर आहे, अशी माहिती प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत देण्यात आली.

जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची बैठक आज जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पार पडली. जिल्हाधिकारी निमा अरोरा अध्यक्षस्थानी होत्या. या बैठकीस  जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.गजानन दळवी,  डॉ. तुषार बावने तसेच अन्य सदस्य आदी उपस्थित होते.

२ कोटी २६ लक्ष ३८ हजार रुपयांचे अर्थसहाय्य वितरीत

गोवंशीय जनावरांमधील लम्पि चर्मरोगाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील स्थितीचा आढावा यावेळी घेण्यात आला. जिल्ह्यात २ लाख ३३ हजार २७२ गोवंशीय जनावरे आहेत. आतापर्यंत २८ हजार १९८ जनावरांना लम्पिचा संसर्ग झाला असून  २४ हजार २१८ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. आतापर्यंत १६२२ जनावरे दगावली असून २३५८ जनावरे सध्या सक्रिय रुग्ण आहेत. राष्ट्रीय आपत्ती धोरणातील निकषांनुसार लम्पिचर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या पशुपालकांना  अर्थसहाय्य देण्यात येत आहे. त्यातील निकषानुसार मोठ्या दुधाळ जनावरांसाठी ३० हजार रुपये, ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी २५ हजार रुपये तर लहान जनावरांसाठी(वासरे)१६ हजार रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य दिले जाते. आतापर्यंत जिल्ह्यात १६२२ जनावरे दगावली असून  दि.१४ नोव्हेंबर अखेर च्या प्रस्तावानुसार १३०९ दगावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना अर्थसहाय्याचे ३ कोटी १८ लक्ष २१ हजार रुपयांचा प्रस्ताव  आहे. त्यापैकी ९१३ जनावरांच्या पशुपालकांना २ कोटी २६ लक्ष ३८ हजार रुपयांचे अर्थसहाय्य वितरीत झाले असून उर्वरित वितरण प्रगतीपथावर आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

जनावरांना मोकाट सोडू नका- जिल्हाधिकारी

लम्पिचा प्रादुर्भाव होत असतांना शहरात विशेषतः अकोला महानगरात जनावरे मोकाट फिरतांना दिसून येत आहेत. मोकाट जनावरांच्या पालकांनी आपल्या जनावरांना मोकाट सोडू नये. आपल्या जनावरांची काळजी घेणे, त्यांना योग्य ती शुश्रूषा देणे आवश्यक असून त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष पशुपालकांनी द्यावे. त्यात प्रथिनयुक्त आहाराचा अधिक समावेश करावा असा सल्लाही पशुवैद्यकांनी दिला आहे. आपल्या जनावरांना  सुरक्षित सावली असलेल्या ठिकाणी ठेवावे. त्यांचा गोठा स्वच्छ ठेवावा. त्यावर जंतूनाशक औषधांची फवारणी ग्रामपंचायतींकडून करुन घ्यावी. या वेळी पशुवैद्यकांनी सांगितले की, सध्या हिवाळा असल्याने जनावरांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. लम्पि सारख्या संसर्गामुळे जनावरांची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने संसर्गाची गुंतागुंत वाढून जनावरांना न्युमोनिआ होण्याची शक्यता वाढते, अशावेळी जनावरांचा थंडीपासून बचाव व्हावा अशा उपाययोजना पशुपालकांनी कराव्या.

कायदेशीर कारवाईचा इशारा

शहरात मोकाट फिरणारे गुरे हे महापालिकेच्या कोंडवाड्यात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्याठिकाणी जनावरांना लागणारा चारा देण्याची व्यवस्था आहे. शिवाय दररोज पशुवैद्यकांनी कोंडवाड्यातील जनावरांची तपासणी करावी,असे निर्देशही जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी यावेळी दिले. याशिवाय जे पशुपालक आपल्या जनावरांना मोकाट सोडून देतात त्यांची जनावरे कोंडवाड्यात ठेवली जातील. तसेच पशुपालकांविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा १९६० चे कलम ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, तरी पशुपालकांनी आपली गुरे मोकाट सोडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ