केंद्रिय विद्यालयाची प्रवेशप्रक्रिया लवकरच सुरू होणार; विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा जिल्हाधिकारी वर्षा मीना

 



केंद्रिय विद्यालयाची प्रवेशप्रक्रिया लवकरच सुरू होणार;

विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा

जिल्हाधिकारी वर्षा मीना

अकोला, दि. ९ : अकोला येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास केंद्रीय विद्यालय संघटनतर्फे मंजुरी व अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे अकोल्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण सुविधा उपलब्ध होणार आहे. तेथील प्रवेशप्रक्रिया तत्काळ सुरू करण्यासाठी गतीने प्रक्रिया राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.

 

केंद्रिय विद्यालयाच्या इमारत, प्रवेशप्रक्रिया आदी व्यवस्थेच्या अनुषंगाने बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत बैठक आज झाली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, साबांवि कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, विद्यालयाचे प्राचार्य बालाजी मारकवार आदी अधिकारी उपस्थित होते.

यंदा प्रवेशप्रक्रिया सुरू होण्यासाठी शाळेसाठी हरिहरपेठेतील जि. प. शाळेची जागा तात्पुरत्या स्वरूपात निश्चित करण्यात आली असून, तिथे लवकरच शाळा सुरू होणार आहे. शाळेची प्रवेशप्रक्रियाही लवकरच सुरू होईल. त्यादृष्टीने आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. इमारतीत कार्यालय आणि वर्ग सुरळीत सुरू होण्यासाठी सर्व कक्ष सुसज्ज करावे. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक साहित्याची तजवीज ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी दिले.

विद्यालय पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करावी. विद्यालयाबाबत सर्वदूर माहिती प्रसारित करून प्रवेशप्रक्रियेला लवकर सुरूवात करावी जेणेकरून प्रवेशानंतर प्रत्यक्ष सत्र सुरू होऊ शकेल.

केंद्रीय विद्यालयासाठी गुडधी येथे जागा मंजूर करण्यात आली असून, तिथे कायमस्वरूपी इमारत निर्माण होणार आहे.  शाळा पहिल्या टप्प्यात इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गांसह (प्रत्येक इयत्तेची एक तुकडी) सुरू केली जात आहे. प्रत्येक वर्गाची प्रवेश क्षमता ४० आहे. विद्यालयाच्या कार्यालयाचे कार्यान्वयन, तांत्रिक बाबींची पूर्तता जलदपणे आटोपून लवकरच प्रवेशप्रक्रियेची माहिती व तारखा जाहीर करण्यात येतील, अशी माहिती प्राचार्य श्री.मारकवार यांनी दिली.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना