जिल्हाधिकारी अकोला यांच्या हस्ते तीन दत्तक विधान प्रक्रिया संपन्न

 जिल्हाधिकारी अकोला यांच्या हस्ते तीन दत्तक विधान प्रक्रिया संपन्न


अकोला, दि. 16 जुलै 2026 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, अकोला अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या समन्वयाने दिनांक 15 जुलै 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे मा. जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्या हस्ते दत्तक विधान प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.

या दत्तक प्रक्रियेत उत्कर्ष शिशुगृह, मलकापूर येथील एका बालिकेला नांदेड येथील इच्छुक दत्तक पालकांकडे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दत्तक देण्यात आले. दत्तक प्रक्रियेमुळे बालकाला सुरक्षित, प्रेमळ व संगोपनासाठी योग्य कुटुंब उपलब्ध होऊन त्याच्या सर्वांगीण विकासास चालना मिळते, असे यावेळी नमूद करण्यात आले.

ही संपूर्ण दत्तक प्रक्रिया भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित नियमांनुसार तसेच केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अत्यंत पारदर्शक, कायदेशीर व नियमानुसार पूर्ण करण्यात आली.

यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडूलकर, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील सरकटे, सुनील लाडुलकर , सचिन घाटे, सतीश राठोड, नितीन अहिर तसेच उत्कर्ष शिशुगृह, अकोला येथील उमेश पाटील, संबंधित दत्तक पालक व इतर मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत कायदेशीरदृष्ट्या दत्तक देण्यास पात्र बालकांना सुरक्षित, प्रेमळ व कायमस्वरूपी कुटुंब मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. दत्तक इच्छुक पालकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अकोला, चाईल्ड हेल्प लाईन 1098, बाल कल्याण समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले.
--

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना