अकोला (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात शाळा ८ ऑगस्टपर्यंत सकाळच्या सत्रात भरणार

  

अकोला (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात

शाळा ८ ऑगस्टपर्यंत सकाळच्या सत्रात भरणार

अकोला, दि. ३०:  मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत कार्यरत मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना निवडणूक कामकाज सुलभपणे पार पाडता यावे यासाठी ३०-अकोला (पश्चिम) विधानसभा मतदारसंघातील संबंधित शाळा ८ ऑगस्टपर्यंत सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा मीना यांनी दिले आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. याअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून ८ ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदारांचे गणना पत्रक भरून घेण्याची कार्यवाही होत आहे. नियुक्त केलेले बहुतांश बीएलओ हे शिक्षक संवर्गातील असल्याने, त्यांना या कामासाठी पुरेसा वेळ मिळावा याकरिता अकोला जिल्ह्यातील शाळा यापूर्वी ३० जुलैपर्यंत सकाळी ७.०० ते दुपारी १.०० या वेळेत भरवण्यात आल्या होत्या.

अकोला (पश्चिम) विधानसभा मतदारसंघातील काम विहित मुदतीत पूर्ण करणे सुलभ व्हावे म्हणून या मतदार संघातील ज्या शाळांचे शिक्षक बीएलओ म्हणून कार्यरत आहेत किंवा बीएलओ यांना मदत करत आहेत, त्या सर्व शाळा आता ८ ऑगस्टपर्यंत सकाळी ७.०० ते दुपारी १.०० या सकाळच्या सत्रातच भरवल्या जातील.

शाळा सकाळच्या सत्रात घेताना नियमित शाळांच्या तासिकांप्रमाणेच वेळेचे नियोजन केले जाईल. यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. शिक्षण संचालकांनी दिलेल्या सूचनांचे पालन आपल्या स्तरावरून सर्व शाळांकडून करून घ्यावे, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना