श्रावणातील कावड व पालखी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर १६ जुलैला पूर्वतयारी आढावा बैठक

 श्रावणातील कावड व पालखी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर १६ जुलैला पूर्वतयारी आढावा बैठक

अकोला, दि. १३ : श्रावण महिन्याला दि. १३ ऑगस्ट २०२६ पासून प्रारंभ होत असून, अकोला जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात पारंपरिक कावड व पालखी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच भाविकांसाठी आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पूर्वतयारी आढावा बैठक दि. १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक जिल्हादंडाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

सर्व संबंधित विभागांनी आपल्या विभागामार्फत करण्यात आलेल्या नियोजनाच्या माहितीसह बैठकीस उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
श्रावण महिन्यात १७ ऑगस्ट रोजी पहिला श्रावण सोमवार, २४ ऑगस्ट रोजी दुसरा श्रावण सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी तिसरा श्रावण सोमवार (श्री क्षेत्र धारगड यात्रा) तसेच ७ सप्टेंबर रोजी चौथा श्रावण सोमवार असून या दिवशी अकोला शहर व ग्रामीण भागात कावड व पालखी मिरवणुका निघणार आहेत. या कालावधीत मोठ्या संख्येने शिवभक्त गांधीग्राम येथील पूर्णा नदी पात्राजवळ एकत्र येतात. मध्यरात्रीनंतर कावडधारी पूर्णा नदीचे पवित्र जल कावडीत भरून अकोला शहरातील श्री राजराजेश्वर मंदिरात नेऊन भगवान महादेवांच्या पिंडीवर जलाभिषेक करतात.
मिरवणुकीचा मार्ग आपातापा नाका, रेल्वे पूल, शिवाजी महाविद्यालय, अकोट स्टॅण्ड, मामा बेकरी, वियानी चौक, कपडा बाजार, सराफा लाईन, गांधी चौक, कोतवाली चौक, लोखंडी पूल, काळा मारोती टर्न, जय हिंद चौक ते श्री राजराजेश्वर मंदिर असा राहणार आहे. या संपूर्ण मार्गावर कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतूक नियंत्रण, आरोग्य, अग्निशमन, वीज, पाणीपुरवठा तसेच अन्य आपत्कालीन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून नियोजन करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना