जागतिक हिपॅटायटिस दिन लसीकरण, स्वच्छता आणि उपचाराने हिपॅटायटिसवर मात शक्य

 

 

जागतिक हिपॅटायटिस दिन

लसीकरण, स्वच्छता आणि उपचाराने हिपॅटायटिसवर मात शक्य

 

अकोला, दि. २७ : हिपॅटायटिस हा गंभीर आजार असला तरी योग्य माहिती, लसीकरण, स्वच्छता आणि वेळेवर उपचार यांच्या मदतीने त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. जागतिक हिपॅटायटिस दिन हा केवळ एक दिवस नसून निरोगी समाज घडविण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. प्रत्येकाने या आजाराविषयी जागरूक राहून स्वतःचे आणि समाजाचे आरोग्य जपावे, असे आवाहन अकोला येथील जिल्हा आरोग्य कार्यालयाने केले आहे.

जगभरात 28 जुलै रोजी जागतिक हिपॅटायटिस दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश हिपॅटायटिस या आजाराविषयी जनजागृती करणे, त्याची प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगणे आणि वेळेवर निदान व उपचाराचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. त्यानिमित्त संदेश प्रसारित करण्यात आला आहे.

हिपॅटायटिस म्हणजे काय?

हिपॅटायटिस म्हणजे यकृताला (लिव्हरला) होणारी सूज. हा आजार मुख्यतः हिपॅटायटिस ए, बी, सी, डी आणि ई या विषाणूंमुळे होतो. यापैकी हिपॅटायटिस बी आणि सी हे गंभीर स्वरूपाचे असून ते दीर्घकालीन यकृतविकार, यकृत निकामी होणे किंवा यकृताचा कर्करोग होण्यास कारणीभूत ठरू शकतात.

 

लक्षणे :

हिपॅटायटिसची प्रमुख लक्षणे म्हणजे ताप, थकवा, भूक न लागणे, मळमळ, उलट्या, पोटदुखी, डोळे व त्वचा पिवळी पडणे (कावीळ), गडद रंगाची लघवी इत्यादी. काही वेळा सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत.

 

प्रतिबंधात्मक उपाय : हिपॅटायटिस B ची लस वेळेवर घेणे. स्वच्छ पाणी आणि स्वच्छ अन्नाचा वापर करणे. निर्जंतुक सुया व वैद्यकीय उपकरणांचा वापर करणे. सुरक्षित रक्तच चढवणे. वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे. नियमित आरोग्य तपासणी करून घेणे.

 

जागतिक हिपॅटायटिस दिवसानिमित्त विविध आरोग्य शिबिरे, जनजागृती मोहीम, रक्त तपासणी, लसीकरण कार्यक्रम आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले जात आहे. यामुळे लोकांमध्ये या आजाराबद्दल जागरूकता आणि वेळेवर उपचार घेण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.

 000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना