विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध केंद्रांना भेटी; बीएलओच्या कामांचा आढावा प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद घ्यावी जिल्हाधिकारी वर्षा मीना

 









 

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम

जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध केंद्रांना भेटी; बीएलओच्या कामांचा आढावा

प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद घ्यावी

जिल्हाधिकारी वर्षा मीना

अकोला, दि. ३ : मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी विविध मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या कामांचा आढावा घेतला.

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून मतदाराचे गणनापत्र भरुन घेण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सर्वदूर सुरू आहे. त्याअनुषंगाने मोहिमेच्या अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज अकोला शहर, बाळापूर, तसेच पातूर तालुक्यातील केंद्रांना भेट दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार कुणाल झाल्टे, वैभव फरतारे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने फॉर्म वितरण,  नागरिकांकडून परिपूर्ण माहिती भरून घेणे व त्यानुसार माहितीचे डिजिटायझेशन ही सर्व कामे विहित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. प्रत्येक बाब जलद गतीने व दक्षतापूर्वक पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना दिले

सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांनी अकोला शहरातील खडकी येथील केंद्र, तसेच डाबकी रस्ता परिसरातील भिकमचंद खंडेलवाल विद्यालय येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर पातूर येथील मराठी शाळा क्र. १, तसेच बाळापूर येथील शासकीय उर्दू अध्यापक विद्यालय, कासारखेड येथील शाळा आदी अनेक केंद्रांना भेट दिली. यावेळी जिल्हाधिका-यांनी मतदारांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष प्रक्रियेचा पडताळा घेतला, तसेच मतदार बांधवांशी संवाद साधला.

नागरिकांनी बीएलओंना अचूक माहिती द्यावी.. गणनापत्र काळजीपूर्वक भरावे. आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवा. मॅपिंगचे काम पूर्णत्वास न्यावे. नोंदींमध्ये त्रुटी राहता कामा नये. ही प्रक्रिया जलदगतीने राबवावी, असे जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी सांगितले.
 
 

अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीचा पाया आहे. प्रत्येक पात्र मतदाराची योग्य नोंद होणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक ती अचूक माहिती द्यावी आणि विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना