बाळापूर येथे जनगणनाच्या अनुषंगाने जिल्हा जनगणना निर्देशिका पुस्तिका (डीसीएचबी) प्रशिक्षण
बाळापूर येथे जनगणनाच्या अनुषंगाने जिल्हा जनगणना निर्देशिका पुस्तिका (डीसीएचबी) प्रशिक्षण
अकोला, दि. 18 : जनगणना 2027 अंतर्गत जिल्हा जनगणना निर्देशिका पुस्तिका तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या गाव निर्देशिका व शहर निर्देशिका माहिती संकलनाच्या अनुषंगाने बाळापूर तालुक्यात क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. हे प्रशिक्षण 17 जुलै 2026 रोजी नगर परिषद कार्यालय, बाळापूर येथील सभागृहात पार पडले.जनगणना संचालनालयाच्या सहाय्यक संचालक तेजल कटारे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी डीसीएचबी पुस्तिकेसाठी आवश्यक असलेली माहिती अचूक व वेळेत संकलीत करण्याबाबत सूचना दिल्या. जनगणना 2027 अंतर्गत गाव निर्देशिका व शहर निर्देशिका माहिती संकलनाचे काम 16 ऑगस्ट 2026 ते 14 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
प्रशिक्षणादरम्यान क्षेत्रीय अधिकाऱ्यांना शैक्षणिक सुविधा, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा व स्वच्छता, दळणवळण, वाहतूक व संपर्क साधने, बँकिंग व पतसुविधा, वीज व इंधन सुविधा, प्रमुख कृषी उत्पादने, हस्तकला तसेच शहरी भागातील विविध नागरी व पायाभूत सुविधांची माहिती संकलित करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ही माहिती डीसीएचबी ॲप व पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदविण्यात येणार असून, त्यानंतर संपूर्ण जिल्ह्याची माहिती संकलित करून जनगणना प्रक्रियेअंती जिल्हा जनगणना निर्देशिका पुस्तिकेत समाविष्ट करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणास तहसीलदार वैभव फरतारे, गट विकास अधिकारी दीपक सवडे तसेच निवासी नायब तहसीलदार डॉ. सागर भागवत उपस्थित होते. प्रशिक्षणासाठी तहसील कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी, पंचायत समिती बाळापूरमधील ग्रामपंचायत अधिकारी तसेच नगर परिषद बाळापूर येथील क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. या प्रशिक्षणात सुमारे 65 क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
--

.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा