स्वाधारचा लाभ मिळण्यासाठी वसतिगृहासाठी अर्ज केलेला असणे आवश्यक
स्वाधारचा लाभ मिळण्यासाठी
वसतिगृहासाठी अर्ज केलेला असणे आवश्यक
अकोला, दि. 9 : वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्यांना स्वाधार योजनेचा लाभ
मिळतो. त्यामुळे स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी वसतिगृहासाठी अर्ज केलेला असणे बंधनकारक
असल्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मारुती वाठ यांनी स्पष्ट केले.
शासकीय वसतिगृह सुविधेची जागेची मर्यादा लक्षात घेता सर्वच विद्यार्थ्यांना
लाभ देणे शक्य होत नाही. पर्यायाने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासुन
वंचित राहतात. त्यामुळे मागावर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक
अडचणींना सामोरे जावे लागते. हे लक्षात घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार
योजना सुरू करण्यात आली.
योजनेत शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित
जाती व नवबौध्द घटकातील इयत्ता ११ वी १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक
व अव्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता
यावे म्हणुन भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वत्ः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक
रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाते.
स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी इयता ११ वी १२ वी, तसेच व्यावसायिक
व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पात्र विद्यार्थ्यांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी
दि. १५ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तसेच प्रवेशप्रक्रिया अंतिम
करावयाची तारीख ३१ जुलै आहे. https://hmas.mahait.org
या संकेत स्थळावर रीतसर ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक
आहे. गुणवत्तेनुसार अथवा जागेअभावी विद्यार्थ्यांला शासकीय वसतिगृह प्रवेश मिळाला नाही
तरच विद्यार्थी/विद्यार्थीनी स्वाधार योजनेच्या लाभासाठी पात्र राहील.
जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करणार नाहीत त्यांना स्वाधार
योजना तसेच शासकीय वसतिगृह योजनांचा लाभ मिळणार नाही. सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्या
वतीने सर्व पात्र विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात शासकीय वसतिगृहासाठी वेळेत
अर्ज नोदंविण्याचे आवाहन केले आहे जेणेकरुन भविष्यात स्वाधार योजनेचा लाभ देण्यास कोणतीही
तांत्रिक अडचण येणार नाही.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा