स्वाधार योजनेच्या लाभासाठी शासकीय वसतिगृहाचा अर्ज भरणे बंधनकारक; अर्जाची मुदत २२ जुलैपर्यंत

 स्वाधार योजनेच्या लाभासाठी शासकीय वसतिगृहाचा अर्ज भरणे बंधनकारक;

अर्जाची मुदत २२ जुलैपर्यंत
अकोला, दि. 21 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक असल्याचे समाजकल्याण विभागाने स्पष्ट केले आहे. इयत्ता ११ वी, १२ वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश अर्जाची मुदत आता दि. २२ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
राज्यात व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि त्यामध्ये प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत असताना शासकीय वसतिगृहांमध्ये जागांची मर्यादा असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शक्य होत नाही. परिणामी अनेक विद्यार्थी वसतिगृह सुविधेपासून वंचित राहत असून उच्च शिक्षणासाठी त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
ही बाब लक्षात घेऊन शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता ११ वी, १२ वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पात्र विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक खर्चासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. गुणवत्तेनुसार किंवा जागा उपलब्ध नसल्यामुळे ज्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, अशाच विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेसाठी पात्रता मिळेल. शासकीय वसतिगृहासाठी अर्ज न करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजना तसेच शासकीय वसतिगृह योजनांचा लाभ मिळणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाने सर्व पात्र विद्यार्थ्यांना मुदतीत शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन केले असून, भविष्यात स्वाधार योजनेचा लाभ मिळविताना कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये, यासाठी वेळेत अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना