स्काऊट-गाईड उजळणी वर्ग व बिगिनर्स कोर्सचे आयोजन; शाळांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

 स्काऊट-गाईड उजळणी वर्ग व बिगिनर्स कोर्सचे आयोजन; शाळांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

अकोला, दि. 21 : अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि भारत स्काऊट्स अँड गाईड्स, जिल्हा कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय स्काऊट-गाईड उजळणी वर्ग व बिगिनर्स कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या धोरणानुसार शाळांमध्ये स्काऊट-गाईड उपक्रम राबविणे व युनिट नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले असून, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
शिक्षण विभागाच्या आदेशानुसार प्रत्येक शाळेतील युनिट लीडर असलेले संबंधित शिक्षक (स्काऊट मास्टर, गाईड कॅप्टन, कब मास्टर व फ्लॉक लीडर) यांनी पूर्ण गणवेशात उजळणी वर्गास उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
तालुकानिहाय वेळापत्रक : उजळणी वर्ग स्काऊट-गाईड सभागृह, वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहेत. त्यानुसार दि. ३ ऑगस्ट रोजी अकोला शहर, ४ ऑगस्ट रोजी अकोला ग्रामीण, ५ ऑगस्ट रोजी अकोट व तेल्हारा, ६ ऑगस्ट रोजी मूर्तिजापूर व बार्शीटाकळी, तर ७ ऑगस्ट रोजी बाळापूर व पातूर तालुक्यांसाठी वर्ग आयोजित करण्यात आले आहेत.
अभ्यासक्रमातील बदलांवर मार्गदर्शन : उजळणी वर्गामध्ये प्रवेश ते तृतीय सोपानपर्यंतची उजळणी, अभ्यासक्रमातील बदल, राज्य व राष्ट्रपती पुरस्कार, सुवर्ण बाण, सामुदायिक विकास कार्यक्रम, प्राविण्य पदके, युनिट रेकॉर्ड्स, प्रगतीपत्रक, युनिट लीडर प्रशिक्षण तसेच नवीन ओवायएमएस (OYMS) ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सहभागी शिक्षकांनी २०० पानी कोरी वही व पेन सोबत आणणे आवश्यक आहे.
नोंदणी नसलेल्या शाळांनी अर्ज आणावेत : ज्या शाळांनी अद्याप स्काऊट-गाईड युनिटची नोंदणी केलेली नाही, त्यांनी युनिट नोंदणी अर्ज पूर्ण भरून वर्गाला उपस्थित राहावे. खाजगी शाळांनी अर्जाच्या तीन प्रती, तर जिल्हा परिषद शाळांनी चार प्रती सोबत आणाव्यात. उपस्थित राहणाऱ्या सर्व युनिट लीडर्सना शाळेतून ऑनड्युटी कार्यमुक्त करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
या प्रशिक्षणाचा लाभ सर्व शाळांनी घ्यावा व मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षण अधिकारी अरविंद मोहरे, जिल्हा आयुक्त (स्काऊट) तसेच प्राथमिक शिक्षण अधिकारी रतनसिंग पवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा संघटक (स्काऊट) किरण लहाने (मो. ९८५०३९२७१७) किंवा जिल्हा संघटक (गाईड) जयमाला जाधव (मो. ७२१९११९३४३) यांच्याशी संपर्क साधावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना