माझं गाव आरोग्यसंपन्न गाव अभियान

 


माझं गाव आरोग्यसंपन्न गाव अभियान

 मूर्तिजापूर पंचायत समितीत मेळावा; सरपंच, ग्रामसेवकांचा सहभाग

अकोला, दि. ३ : "माझं गाव आरोग्यसंपन्न गाव अभियान 2026-27" ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने मूर्तिजापूर पंचायत समिती येथे तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार हरीश पिंपळे होते.

 

तालुक्यातील सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून एकत्रितपणे कार्य करावे, असे आवाहन श्री. पिंपळे यांनी यावेळी केले.

तालुका आरोग्य अधिकारी यांनी अभियानातील 58 निर्देशांकांनुसार ग्रामपंचायतींनी करावयाच्या कामांची सविस्तर माहिती दिली. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी असलेल्या ₹5 कोटी, ₹3 कोटी आणि ₹2 कोटींच्या पारितोषिकांसह विभागीय व जिल्हास्तरीय पुरस्कार योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

 

अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटासाठी नोडल अधिकाऱ्यांची तसेच प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. महिनानिहाय करावयाच्या कामांचा आढावा घेऊन पुढील कृती आराखड्यावर चर्चा करण्यात आली.

 

तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करून पुरस्कारासाठी पात्र ठरावे, यासाठी तालुका स्तरापासून गाव पातळीपर्यंत सर्वांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार हरीश पिंपळे यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना