कन्व्हेयन्स अभावी अकोल्यातील अनेक गृहनिर्माण सोसायट्या धोक्यात; डिम्ड कन्व्हेयन्स करून घ्या - उपनिबंधक ज्योती मलिये
कन्व्हेयन्स अभावी अकोल्यातील अनेक गृहनिर्माण सोसायट्या धोक्यात; डिम्ड कन्व्हेयन्स करून घ्या
- उपनिबंधक ज्योती मलिये
अकोला, दि. 21 : शहरासह जिल्ह्यातील अनेक जुन्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये फ्लॅटधारकांना आपल्या घराचा ताबा असला तरी सोसायटीच्या नावावर जमीन व इमारतीचा मालकी हक्क हस्तांतरित (कन्व्हेयन्स) झालेला नसल्याने भविष्यात गंभीर कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित सोसायट्यांनी वेळेत कन्व्हेयन्स अथवा आवश्यक असल्यास डिम्ड कन्व्हेयन्सची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तालुका सहकारी संस्थेच्या उपनिबंधक ज्योती मलिये यांनी केले आहे.गृहनिर्माण सोसायटीच्या संदर्भात कन्व्हेयन्स म्हणजे बिल्डर किंवा विकासकाकडून सोसायटीच्या नावावर जमीन व इमारतीचा मालकी हक्क हस्तांतरित करण्याची कायदेशीर प्रक्रिया होय. फ्लॅटधारकांना त्यांच्या फ्लॅटचा ताबा मिळत असला तरी संपूर्ण इमारत व जमिनीचा मालकी हक्क सोसायटीकडे येण्यासाठी कन्व्हेयन्स आवश्यक असते. विकासकाने हा हक्क देण्यास टाळाटाळ केल्यास "डिम्ड कन्व्हेयन्स" या कायदेशीर प्रक्रियेद्वारे सोसायटीला हा हक्क मिळवता येतो.
महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स अॅक्ट (MOFA) च्या कलम 11 नुसार, सोसायटीची नोंदणी झाल्यानंतर चार महिन्यांच्या आत विकासकाने जमीन व इमारतीचा मालकी हक्क सोसायटीच्या नावावर हस्तांतरित करणे बंधनकारक आहे. मात्र अनेक प्रकरणांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचे दिसून येते.
कन्व्हेयन्स न झाल्यास फ्लॅटधारकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते. पुनर्विकासाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होणे, इमारतीची पुनर्बांधणी करताना अडचणी येणे, बिल्डरकडून अतिरिक्त एफएसआय किंवा खुल्या जागेचा लाभ घेण्याची शक्यता, तसेच पार्किंग, गच्ची किंवा इतर जागांबाबत वाद निर्माण होण्याचा धोका वाढतो. याशिवाय अनेक वर्षांनंतर कन्व्हेयन्सची मागणी केल्यास बिल्डरकडून मोठ्या रकमेची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विकासकाने कायद्यानुसार कन्व्हेयन्सची प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास संबंधित गृहनिर्माण संस्थांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, आदर्श कॉलनी सहकार संकुल, अकोला येथे विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करून डिम्ड कन्व्हेयन्स प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा, असे आवाहन उपनिबंधक ज्योती मलिये यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा