जलशक्ती अभियानः केंद्रीय पथकाने घेतला आढावा;केली कामांची पाहणी

 









अकोला दि.13(जिमाका)- केंद्रपुरस्कृत ‘जलशक्ती अभियान: कॅच द रेन’ अंतर्गत विविध विभागाव्दारे करण्यात आलेल्या कामांचा आढावा आज केंद्रीय पथकाने घेतला. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन सादरीकरणही करण्यात आले.

जलशक्ती  अभियानः कॅच दी रेन या अभियानाचा आढावा व पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात आज केंद्रीय पथक दाखल झाले. केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालय विभाग नवी दिल्लीचे संचालक प्रशांत अग्रवाल व केंद्रीय जल, उर्जा व संशोधन संस्था पूणेचे वैज्ञानिक भुषण तायडे या दोन तज्ज्ञ सदस्यांच्या पथकाने जिल्ह्यातील विविध विभागाव्दारे जलशक्ती अभियानाअंतर्गत केलेल्या कामाचा आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता व्दिवेदी, जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर,  शिक्षणाधिकारी(प्राथ.) वैशाली ठग, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे व अन्य विभागांचे विभाग प्रमुख व अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी  जिल्ह्यात जलशक्ती अभियानातंर्गत झालेल्या कामाचे सादरीकरण केले. तसेच नव्याने होत असलेल्या कामांची माहिती दिली. लोकसहभागातून नदी, नाले व तलावातील गाळ काढण्यात आलेल्या कामाची माहिती व सादरीकरण करण्यात आले. तसेच जलशक्ती अभियानातंर्गत कॅच द रेन या उपक्रमाचा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालयस्तरावर जनजागृती करण्यात येत असल्याबद्दलही त्यांनी माहिती दिली.

त्यानंतर केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील शिवापूर, घुसर, अनकवाडी व आपोती बु. येथील नदी व नाल्याचे खोलीकरण केलेल्या कामाची पाहणी केली. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांची भेट घेतली.  यावेळी कुलगूरु डॉ. विलास भाले यांनी कृषी विद्यापीठाविषयी व जलसंधारण संदर्भांत केलेल्या  कामाची माहिती केंद्रीय पथकास दिली. कृषी विद्यापीठ अंतर्गत बाबुळगाव येथील तलावाची पाहणी केली.

केंद्रीय पथकाचा तीन दिवसीय दौरा कार्यक्रम असून या दौरा कार्यक्रमा दरम्यान जलशक्ती अभियानातंर्गत विविध विभागाव्दारे केलेल्या कामाची पाहणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांनी दिली.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ