महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर रुग्ण सेवा हाच खरा धर्म-पालकमंत्री बच्चू कडू

 



          अकोला,दि.6(जिमाका)-  शासकीय आरोग्य यंत्रणेने सात तालुक्यात अथक परिश्रम केल्यामुळे  जिल्ह्यातील शेकडो महिलांना मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचा लाभ झाला आहे. या शिबीरामध्ये आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कामे कौतुकास्पद असून रुग्ण सेवा हाच खरा धर्म आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.

महिला आरोग्य तपासणी शिबिरांचा समारोप आज जिल्हा स्त्री रुग्णालयात पार पडला. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. आरती कुलवाल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जगदीश बनसोडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना पटोकार, प्रशासकीय अधिकारी डॉ. आप्पा डांबरे, डॉ. चिमणकर, डॉ. मोहिते, जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, अधीपरिचारिका व महिला रुग्ण उपस्थित होते.

पालकमंत्री बच्चू कडू म्हणाले की,  दि. 30 मे ते 6 जूनपर्यंत महिलांकरीता मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीरांचे आयोजन केले. याशिबीरात जिल्ह्यातील महिलांनी मोठया प्रमाणात सहभागी होवून तपासणी व उपचार घेतला. या शिबीरामुळे महिलांमध्ये लहान व मोठे आजाराचे लक्षणे दिसून आले. महिलांनी अंगावर दुखणे काढल्यामुळे त्यांना मोठे आजार असल्याचे या शिबीरातून लक्षात आले. महिलांनी घाबरुण न जाता आपल्यावर विनामुल्य शस्त्रक्रिया व उपचार करु. याकरीता जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वा खाजगीस्तरावरही आवश्यक उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतील. येथेही उपचार शक्य नसल्यास मुंबई वा अन्य मोठ्या शहरात नेऊन मोफत उपचार करण्याचा निर्धार व्यक्त केला. या शिबीराकरीता झटणाऱ्या आरोग्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी, आशा सेविका या साऱ्यांचे पालकमंत्र्यांनी कौतूक केले.

आरोग्य तपासणी शिबीरास महिलांना आरोग्य यंत्रणेमार्फत प्राथमिक तपासणी करुन रुग्णालयापर्यंत आणण्यात आले. येथे त्यांची सर्व तज्ज्ञांमार्फत तपासणी, निदान व अनुषंगिक उपचार करण्यात आले. या शिबिरात स्त्रियांचे विविध आजार, कर्करोग, रक्ताचे विकार, त्वचा विकार, किडनीचे आजार, हाडांचे विकार, दातांचे विकार या सह विविध आजारांवर उपचार करण्यात आले. त्यात 6625 महिलांचे 7697 विविध आजारांची तपासणी करण्यात आले. तर 363 रुग्णांची मोठया शस्त्रक्रिया व 362 रुग्णांची लहान शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. या महिला रुग्णांवर जिल्हा स्त्री रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात  शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. आरती कुलवाल यांनी दिली.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ