विशेष लेखः पावसाळा आणि पाळीव जनावरांचे व्यवस्थापन

 

वातावरणात बदल झाला की जनावरांच्या नियमित वागणूकीत तसेच आरोग्यावर सुद्धा विपरीत बदल होत असल्याचे दिसुन येते. वातावरणाच्या तापमानात होणारा बदल, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता किंवा टंचाई आणि वैरणात होणारा बदल इत्यादींचा परिणाम जनावरांच्या वागणूकीवर, आरोग्यावर तसेच प्रजननावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या झालेला  दिसतो व याचाच परिणाम म्हणून पशुपासुन मिळणाऱ्या उत्पादनात घट होते व परिणामी पशुपालकाचे आर्थिक नूकसान होते. म्हणूनच सध्या पावसाळ्यात पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घेणे आवश्यक ठरते. पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही याकरीता व्यवस्थापनाच्या काही गोष्टी कडे कटाक्षाने लक्ष देणे क्रमप्राप्त ठरते, उदा. जनावरांचा गोठा नियमित स्वच्छ ठेवावा, गोठ्यात पावसाची सर येणार नाही किंवा छतामधून पाणी गळणार नाही याची दक्षता घ्यावी, गोठ्याच्या आजुबाजुला गवत किंवा झाडे झुडपे वाढु देऊ नये, आजुबाजुला गवत किंवा झाडे झुडपे असल्यास त्यांचा नायनाट करावा, पावसाळ्याच्या सुरवातीलाच जनावरांना कृमीनाशक औषधाची मात्रा द्यावी, जनावरांच्या गोठ्याचे तसेच गोठ्याच्या आजुबाजुच्या जागेचे सुंदरीकरण करुन नियमित निर्जंतुकीकरण करावे, तसेच जनावरांना द्यावयाचे खाद्य पावसाने ओले होणार नाही याची काळजी घ्यावी. वरील प्रकारे पशुपालकांनी जनावरांची काळजी घेतल्यास पावसाळ्यात जनावर निरोगी राहते व त्याचा फायदा पशुपालकांनाच होतो. जनावरांना पावसाळ्यात होणारे अपाय व त्यावरील उपाययोजनांविषयी या लेखात थोडक्यात माहीती दिली आहे.

पावसाळ्यामध्ये जर जनावरांचा गोठा गळत असेल तर त्याचा प्रत्यक्ष परिणाम जनावरांच्या प्रजनन व कार्यक्षमतेवर होतो कारण अशा गोठ्यांमधील वातावरण ओलसर व कोंदट राहते. अशा गोठ्यामधे जर हवा खेळती राहत नसेल तर काही विषारी वायुंची (उदा. अमोनिया) निर्मिती होते व त्यामुळे जनावरांच्या डोळ्यावर सूज येते. तसेच जनावरांच्या शरीराची आग होऊन खाज सुटते. या सगळ्यामुळे जनावर अस्वस्थ होते व परिणामी जनावरांची उत्पादन क्षमता कमी होते. घरामधे ओलसर वातावरण राहत असल्यास विशेषतः कोंबड्यांमध्ये कॉक्सीडायोसीस रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येतो.

पावसाळ्यामधे गवताची उगवण क्षमता तसेच वाढ अधिक प्रमाणात असते. गवत झपाट्याने वाढणे ही जनावरांच्या दृष्टीने चांगली असते कारण त्यांना भरपूर खाद्य मिळते, परंतु हेच जनावरांना अपायकारक ठरु शकते. कारण पावसाळ्यात उगवणारे गवत मऊ असते, ते जनावरे कमी वेळात अधिक गवत खातात व कोरडा चारा कमी खातात. पावसाळ्यात उगवणाऱ्या गवतात पाण्याचे प्रमाण अधिक असते व तंतुमय पदार्थाचे प्रमाण कमी असते त्यामुळे जनावरांची अन्न पचनाची क्रिया बिघडते व जनावरांना हगवण लागते. करीता पावसाळ्यात जनावरांना हिरवे गवतासोबतच वाळलेला कोरडा तंतुमय चारा सुद्धा खाऊ घालणे आवश्यक असते.

पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता अधिक असल्याकारणाने हे वातावरण विविध प्रकारच्या जीवाणू तसेच विषाणूंच्या वाढीस पोषक ठरते व निरनिराळया जीवाणूंची आणि विषाणूंची झपाट्याने वाढ होऊन जनावरे जीवाणूजन्य व विषाणूजन्य रोगास बळी पडतात. बाजारात काही जीवाणू तसेच विषाणूजन्य रोगाविरुद्ध लसी उपलब्ध आहेत त्यांचे पशुवैद्यकाच्या मदतीने जनावरांमध्ये योग्य वेळी लसीकरण करुन घ्यावे (उदा. एकटांग्या, घटसर्प, तोंडखुरी पायखुरी इत्यादी). तसेच पावसाळ्यात जनावरांच्या वागणूकीवर कटाक्षाने नजर ठेवावी जेणेकरुन जनावरांमध्ये रोगाचे लक्षणे दिसताच त्यांचा पशुवैद्यकाकडून योग्य तो उपचार करता येईल. जीवाणूसारखेच जनावरांमधे नियमीत दिसुन येणाऱ्या कृमींना सुद्धा पावसाळ्यातील वातावरण पोषक ठरते व परिणामी जनावरे वेगवेगळ्या कृमींना बळी पडतात. जनावरांना कृमींपासुन वाचविण्याकरीता प्रत्येक पशुपालकांनी पावसाळा सुरु होण्याअगोदर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना कृमीनाशक औषधाची मात्रा द्यावी व पावसाळा संपल्यावर सुद्धा वर्षभर ठराविक अंदाजपत्रकानूसार नियमित कृमीनाशक औषधे देत रहावी.

जनावरांच्या बाह्य शरीरावर असणाऱ्या गोचीडांचा जनावरांना इजा पोहचविण्यामध्ये आणि जनावरांपासुन मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नामधे घट होण्यामागे फार मोलाचा वाटा असतो. गोचीडांना सुद्धा पावसाळ्याचे वातावरण पोषक असते व पावसाळ्यात एका जनावरांपासुन दुसऱ्या जनावरांत गोचीडाचा प्रसार वेगाने होतो. वेळीच जर गोचीडांचा बंदोबस्त केला नाही तर जनावर मृत्युमुखी सुद्धा पडू शकते. जनावरांच्या शरीरावर असणारे गोचीड जनावरांचे शरीरातील रक्त तर शोषतातच शिवाय काही विशिष्ट रोगाचा प्रसार सुद्धा करतात (उदा. थायलेरीया). गोचीडाचा चावा जनावरांना फार वेदनादायक असतो. गोचीड वारंवार चावा घेत असल्याकारणाने जनावर अस्वस्थ राहते व परिणामी उत्पादन कमी मिळते. आपल्या जनावरांमधे गोचीडाचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा झाला असल्यास पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांच्या शरीरावर विशिष्ट औषधांची फवारणी करावी. तसेच गोठ्याच्या आजुबाजुला झाडे झुडपे वाढणार नाही याची दक्षता घ्यावी.

अधिक उत्पादनक्षम मादी जनावरांमधे दगडीकास रोगाचे प्रमाण जास्त असते आणि पावसाळ्यात अशी जनावरे दगडीकास रोगास लवकर बळी पडतात. एकदा जर जनावराला दगडीकास रोग झाला तर मग भविष्यात त्या जनावरांपासुन मिळणाऱ्या दुग्ध उत्पादनात कायमची घट होत जाते. पावसाळ्यातील वातावरण रोगकारक जीवजंतूस पोषक असते. गोठा अस्वच्छ किंवा चिखल असल्यास तिथे त्यांचे प्रमाण अधिक असते व जनावर खाली बसल्यावर कासेचा प्रत्यक्ष संबध रोगकारक जीवजंतुसोबत येऊन जनावरांना दगडीकास रोग होतो. जनावरांना दगडीकास रोग होऊ नये याकरीता गोठा नियमित स्वच्छ करुन त्याचे निर्जंतुकीकरण करावे. दुध काढणाऱ्या व्यक्तीचे कपडे स्वच्छ असावे व दुध काढण्याअगोदर हात स्वच्छ धुवून काढावे. जनावराचे दुध काढण्या अगोदर तसेच दुध काढल्यानंतर कास कोमट पाण्याने स्वच्छ धूवून काढावी. एका जनावराचे दुध काढुन झाल्यावर दुसऱ्या जनावराचे दुध काढावयाचे असल्यास परत हात स्वच्छ धूवावे व नंतरच मग दुसऱ्या जनावराचे दुध काढावे. दुध काढण्याकरीता मशीन वापरत असल्यास मशीनचे सुद्धा नियमित निर्जंतुकीकरण करावे. दगडीकास रोगाची शंका आल्यास पशुवैद्यकाकडून लगेच योग्य तो उपचार करुन घ्यावा.

पावसाळ्यात साठवलेल्या पशुखाद्याची योग्य ती काळजी घ्यावी जेणेकरुन खाद्य पावसाच्या पाण्यामुळे ओले होणार नाही. साठवून ठेवलेले ओले किंवा कोरडे खाद्य पावसाच्या पाण्यामुळे ओले झाल्यास त्यावर बुरशीची वाढ होते व असे बुरशीजन्य खाद्य जर जनावरांनी खाल्ले तर जनावरांना बुरशीजन्य रोगाची लागण होते व बरेचदा विषबाधा होऊन जनावरे मृत्युमुखी पडतात.

पावसाळा हा ऋतु जवळपास सगळ्याच रोगकारकास पोषक असल्या कारणाने जनावरे विविध रोगास बळी पडतात, परंतु वरील प्रकारे उपाययोजना आखुन जनावरांची काळजी घेतल्यास निश्चितच जनावरांचा विविध रोगांपासुन बचाव करु शकतो.

लेखक-डॉ. रणजीत इंगोले आणि डॉ. भूपेश कामडी

पशुविकृतीशास्त्र विभाग,

स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला

(मोबा. 9822866544)

(संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, अकोला)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ