मान्सूनपूर्व आढावा सभा:‘किटकजन्य आजार’ नियंत्रणासाठी राबवा प्रतिबंधात्मक उपाययोजना- डॉ. कमलेश भंडारी

 



            अकोला,दि. 16(जिमाका)- आता कोविडचा उद्रेक कमी असला तरी कोविडच्या पार्श्वभुमिवर पावसाळ्यात विविध किटकांमुळे (डास, मच्छर, माशा इ.) होणाऱ्या आजारांवर आरोग्य यंत्रणेने अधिकाधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्या,असे सहायक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) डॉ. कमलेश भंडारी यांनी आरोग्य यंत्रणेस दिले.

किटकजन्य आजारांची  स्थिती व प्रतिबंधात्मक उपाययोजना या संदर्भात मान्सूनपूर्व आढावा सभा सोमवारी (दि.13) पार पडली. यावेळी आरोग्य सेवा (हिवताप) चे सहाय्यक संचालक डॉ. कमलेश भंडारी यांनी उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी हिवताप, डेंगू व चिकनगुनिया या आजाराचे रोग लक्षणे व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करुन पीपीटीव्दारे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी आरोग्य निरीक्षक व प्रयोगशाळा वैज्ञानिक उपस्थित होते.  जिल्ह्यातील  अतिजोखमीच्या 15प्राथमिक आरोग्य केंद्राचा व मागील तीन वर्षातील रुग्ण संख्येचा अभ्यास करुन  त्या त्या गावांचा आढावा घेऊन विशेष लक्ष केंद्रीत करावे, असे निर्देश डॉ. भंडारी यांनी दिले. तसेच कोविडजन्य परिस्थितीनंतर सर्व आरोग्य कमचाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोनातुन कामे करावे, असे आवाहनही केले. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.आदित्य महानकर यांनी जिल्ह्यातील किटकजन्य रोगाची स्थिती व करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेची माहिती दिली. तसेच माहे जून ते ऑक्टोबर महिन्यामध्ये किटकजन्य आजाराचा पारेषण  काळ असल्याने नागरिकांनी डासांची वाढ होवू नये; याकरीता नाल्या वाहत्या करणे, एक दिवस पाण्याचे साठे रिकामे करुन कोरडा दिवस पाळणे व सेप्टीक टँकचे व्हेंट पाईपला कापड बांधणे यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या, असे आवाहन केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ