पालकमंत्री रोजगार नोंदणी पंधरवाड्याचा शुभारंभ: रोजगारासाठी प्रशिक्षण, अर्थसहाय्य, तांत्रिक मार्गदर्शनासाठी सहाय्य करणार-पालकमंत्री बच्चू कडू

 









             अकोला दि.14(जिमाका)- जिल्ह्यातील युवक युवतींनी आपल्याला कोणत्या प्रकारच्या रोजगाराची अपेक्षा आहे, यासह आपली नोंदणी या पंधरवाड्यात करावी, या नोंदणीच्या आधारे प्राप्त माहितीचे वर्गीकरण करुन रोजगारासाठी आवश्यक प्रशिक्षण, उद्योगासाठी अर्थसहाय्य, तांत्रिक मार्गदर्शन असे सर्वतोपरी सहाय्य देऊन जिल्ह्यातील युवक युवतींना  रोजगाराभिमुख करणार,अशी घोषणा राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी आज अकोट येथे केली.

पालकमंत्री रोजगार नोंदणी पंधरवाड्याच्या आज अकोट नगरपालिकेच्या सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी निमा अरोरा, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत,  नगरपालिका प्रशासन अधिकारी सुप्रिया तौलारे, कौशल्य विकास अधिकारी ठाकरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा प्रारंभ अकोट शहरातून करण्यात आला.  या प्रसंगी नोंदणी केलेल्या युवक युवतींना प्रातिनिधीक स्वरुपात नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. आता ही नोंदणी येत्या 1 मे पर्यंत सुरु राहणार असून ही नोंदणी आपल्या गावातच करता येणार आहे, ह्या संधीचा युवक युवतींनी लाभ घ्यावा,असे आवाहन यावेळी पालकमंत्री कडू यांनी केले.

आपल्या संबोधनात ते म्हणाले की, रोजगार नोंदणी नंतर हे लक्षात येईल की, युवकांना कशा प्रकारचा रोजगार हवा आहे. कुणाला खाजगी कंपनीत काम करावयाचे आहे, कुणास शासकीय सेवेत जावयाचे आहे, कुणी लहान मोठा उद्योग करु इच्छितो, कुणी व्यवसाय करु इच्छितो, कुणाला शेती वा शेतीपूरक उद्योग करावयाचा आहे, कुणाला पोलीस दलात, सैन्यदलात जाण्याची इच्छा आहे अशा प्रकारचे वर्गीकरण करुन त्यांच्या इच्छेनुसार त्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण, अर्थसहाय्य इ. प्रकारचे सहाय्य करण्यात येईल. खाजगी क्षेत्रातील रोजगार देणारे व ज्यांना रोजगार हवा आहे असे युवक यांचा समन्वय घालून देण्याचे काम करु, त्यातून  रोजगाराची उपलब्धता होईल. याशिवाय महारोजगार अभियान हे प्रदर्शनही आयोजित करुन रोजगार देण्याचा प्रयत्न करु, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

 याच कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते व्यवसायासाठी अर्थसहाय्य मंजूर झालेल्या बचत गटांना अर्थसहाय्याचे धनादेश वितरीत करण्यात आले.

रोजगार नोंदणी कशी करावी?

या उपक्रमाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत,नगरपरिषद,महानगरपालिका क्षेत्रात रोजगार नोंदणी केंद्र निर्माण करण्‍यात आले आहेत. त्या केंद्रावर बेरोजगार युवक/युवती यांना आपल्‍या गावातच रोजगार नोंदणी करण्‍याची सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. नोंदणीसाठी रोजगार नोंदणी प्रपत्र तयार करण्‍यात आले आहे. त्यात-

प्रपत्र-1- यामध्‍ये  शासकीय/खाजगी नोकरी करीता इच्‍छुक युवक/युवतींनी आपली माहिती भरुन द्यावयाची आहे. शासकीय नोकरी मिळविण्‍यासाठी आवश्‍यक असलेले स्‍पर्धा परीक्षा प्रशिक्षण,पोलीस भरती/सैन्‍य भरती याकरीता आवश्‍यक असलेले प्रशिक्षण मिळविण्‍याकरीता आपली माहिती भरुन द्यावयाची आहे.

प्रपत्र-2- यामध्‍ये स्‍वयंरोजगार/स्‍वत:चा उद्योग करण्‍यास इच्‍छुक असलेल्‍या युवक/युवतींनी त्‍यांना आवश्‍यक स्‍वयंरोजगार/उद्योग/ व्‍यवसाय याबाबत सर्व माहिती भरुन द्यावयाची आहे.

प्रपत्र-3- यामध्‍ये ज्‍या नागरीकांना कृषी व कृषी पुरक उद्योग/व्‍यवसाय/साहित्‍य, तसेच विविध कृषी विषयक योजना यांचा लाभ हवा असल्‍यास त्‍याकरीता त्‍यांनी या प्रपत्रामध्‍ये सर्व माहिती भरुन द्यावयाची आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ