रविवारी (दि.1 मे) सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर; लोकप्रतिनिधी/प्रशासकीय अधिकारी देणार योजनांची माहिती

 अकोला दि.28(जिमाका)- महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या वर्धापन दिनी रविवार दि.1 मे रोजी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर केला जाणार आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती पत्रिका प्रत्येक झेंडा वंदनाच्या ठिकाणी माहिती पत्रिकांचे वाटप होणार आहे, तसेच ग्राम सभांमधून योजनांच्या माहितीचे वाचन होणार आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. अनिता राठोड यांनी दिली आहे.

यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, येत्या 1 मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सामाजिक न्यायाचा जागर करण्यात येणार आहे. याबाबत निर्गमित शासन निर्णयानुसार दि. 1 मे, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सबंध राज्यात झेंडा वंदनाच्या वेळी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची माहिती देणारी माहितीपत्रिका किंवा माहिती पुस्तिका वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री, ग्रामीण भागात लोकप्रितिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या मार्फत या योजनांचे संक्षिप्त स्वरूपात वाचनही करण्यात येणार आहे. 

राज्य सरकारने दोन वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण केला असून, या कालावधीत धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून सामाजिक न्याय विभागाच्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये कालानुरूप सकारात्मक बदल केले आहेत. त्या बदलांचे सकारात्मक परिणाम लाभार्थींच्या टक्केवारीत दिसून येत आहेत. अनेक योजना नाविन्यपूर्ण रीतीने राबविणे, नवीन काही योजना अंमलात आणणे, याद्वारे विभागाच्या कार्याचा एक वेगळा ठसा या काळात उमटवला आहे. 

अनुसूचित जाती, नवबौद्ध घटक यांसह समाजातील आर्थिक दुर्बल व मागास घटकांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या अनेक योजना कार्यरत आहेत, या योजनांच्या बाबतीत जनजागृती करून तळागाळातील गरजूंना लाभ मिळवून देणे हा यामागचा उद्देश असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान दि.1 मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झेंडावंदन होणाऱ्या सर्व शासकीय आस्थापनांच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स, बॅनर्स लावणे तसेच माहितीपत्रिका वाटप करणे यासाठी विभागाने नियोजन केले असून, समाज कल्याण आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्त तसेच महासंचालक, बार्टी यांच्या मार्फत या अभिनव उपक्रमाची येत्या महाराष्ट्र दिनी अंमलबजावणी करण्यात येणार आहे,असेही डॉ. अनिता राठोड यांनी कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ