नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे मालमत्तांचे नवे मूल्यदरतक्ते

 अकोला, दि.1(जिमाका)- मुद्रांक शुल्क आकारणीच्या प्रयोजनाकरीता मालमत्तांचे खरे बाजारमूल्य निर्धारण करण्यासाठीच्या आर्थिक वर्ष 2022-23 च्या वार्षिक मूल्यदरतक्त्यांची अंमलबजावणी दि. 1 एप्रिल 2022 पासून करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या सहसंचालक, नगररचना मूल्यांकन,  महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत हे दरतक्ते तयार केले जातात. अमरावती महसूल विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम या पाच जिल्ह्याच्या वार्षिक मूल्य दरतक्त्यांच्या समावेश असून दुय्यम निबंधक कार्यालय निहाय तयार करण्यात आलेले वार्षिक मूल्यदर तक्ते दि.1 एप्रिल 2022 पासून अंमलात आले आहेत.

अमरावती विभागात पाच जिल्ह्यात 56 तालुके असून  दोन महानगरपालिका, 56 नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्र, 205 प्रभाव क्षेत्रे तथा 7181 ग्रामीण क्षेत्र यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी स्थित असलेल्या शेतजमिनी , रहिवास, बहुविध इमारती, व्यावसायिक, औद्योगिक आदी सर्व प्रकारच्या मिळकतींचे दर याद्वारे निर्धारीत केले जातात. जमिनींचा विद्यमान व प्रस्तावित वापर, खरेदी विक्री व्यवहार, स्थानिक चौकशी, तलाठी माहिती, विकास योजना प्रस्ताव इ. मधील माहिती व आकडेवारी विचारात घेऊन हे सुधारीत दर प्रस्तावित केले जातात. या वर्षी प्रस्तावित दरांमध्ये अमरावती विभागाची सरासरी वाढ 6.26 टक्के एवढी असून अमरावती जिल्हा सरासरी 7.23 टक्के, अकोला जिल्हा 5.46 टक्के, वाशीम जिल्हा 6.53, यवतमाळ जिल्हा 6.45 टक्के , बुलडाणा 5.61 टक्के याप्रमाणे वाढीव दर प्रस्तावित करण्यात आले आहेत.

 यासोबतच  एकापेक्षा अधिक विभागातील गावे वगळणे, ग्रामीण क्षेत्रात नव्या महसुली गावांचा समावेश करणे, गावांच्या नावातील दुरुस्ती, ग्रामीण क्षेत्रातील  राष्ट्रीय / राज्य महामार्गावरील  गावांचे सुधारीत विभाग निश्चिती करणे, तसे प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करुन मालमत्तांचे विभाग निश्चित करणे इ. दुरुस्त्यांसह वार्षिक मुल्य दरतक्ते अधिकाधिक निर्दोष तथा लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी माहिती अमरावती विभागाचे प्र. सहायक संचालक नगर रचना (मूल्यांकन) प्रवीण पेटे  यांनी दिली आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ