खते-बियाणे शेतकऱ्यांना सहज व रास्त दरात उपलब्ध करावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा

 



अकोला, दि.12(जिमाका)- आगामी हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाणे हे सहज व रास्त दरात उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे तसेच खत तसेच बियाणे विक्री करतांना ज्यादा दराने विक्री, लिंकिंग करून विक्री तसेच अप्रमाणित व निकृष्ट खते बियाणे विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी तसेच गैरप्रकार आढळल्यास नियंत्रण कक्षास तक्रार करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा कृषी निविष्ठा सनियंत्रण समिती निमा अरोरा यांनी आज येथे दिले.

जिल्हा कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांतप्पा खोत, सदस्य सचिव तथा कृषि विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, सहाय्यक आयुक्त कामगार राजू गुल्हाने,  जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी, एमएआयडीसीचे ठाकरे, महाबीजचे पिसाळ, अकोला जिल्हा कृषी व्यवसायिक संघाचे उपाध्यक्ष वाटमारे, होलसेलर व डीलर असोशियसनचे प्रतिनिधी, प्रमुख खत कंपनीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले की, जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती पाहता त्याचा फायदा घेऊन खतांची दरवाढ वा साठेबाजी या शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी खते खरेदी करावी. जिल्ह्यात होणारी खत विक्री ही 100% ई पॉस (e Pos) द्वारेच झाली पाहिजे. तसेच खतांची पोहोच 24तासांच्या आत करण्यात यावी. दिलेल्या  आवंटनानुसार सर्व खत कंपनी प्रतिनिधी यांनी जिल्ह्यात खते उपलब्ध करून द्यावी. तसेच तालुका निहाय पुरवठा कृषी विभागाकडून मंजूर करून घ्यावा. जेणेकरून कुठल्याही प्रकारची खत टंचाई निर्माण होणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. या बैठकीत खरीप हंगाम 2022 साठी लागणारे बियाणे, खते मागणी, प्राप्त आवंटन,  शिल्लक खत साठा, बफर स्टॉक संरक्षीत खत साठा  यावर सविस्तर चर्चा झाली. युरिया व डीएपी खतांच्या बफर स्टॉकबाबत तालुकानिहाय गोडाऊन साठवणूक नियोजनाला मंजुरी देण्यात आली. बियाणे उपलब्धते संदर्भात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांकडे स्वतःचे तीन लाख 56 हजार क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध असल्याचे सांगितले. कृषी विभागामार्फत जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथके तसेच नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत,असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ