पालकमंत्री बच्चू कडू यांची संकल्पना; रेशनकार्ड तक्रारमुक्ती साठी 11 ते 30 एप्रिल दरम्यान विशेष अभियान


अकोला दि.2(जिमाका)- ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना रेशनकार्डसंबंधी कामाकरीता प्रत्येक वेळीस तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. त्यात वेळ व पैशाचाही अपव्यय होतो,हे टाळण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू   कडू यांच्या संकल्पनेतून ग्रामीण व शहरी भागात रेशनकार्ड तक्रारमुक्त गाव अभियान राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आदेश निर्गमित केले असून त्यानुसार दि. 11 ते 30 एप्रिल दरम्यान विशेष मोहिम राबवून  रेशनकार्ड संदर्भातील सर्व कामे त्या भागातील रास्तभाव दुकानदार यांचेमार्फत करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहे.

आदेशात दिलेल्या निर्देशानुसार, करावयाची कामे-

दुय्यम शिधापत्रिका: सर्व रास्तभाव दुकानदार यांनी त्याचे अधिनस्त क्षेत्रातील नागरिक ज्याचे रेशनकार्ड फाटलेले, जीर्ण अथवा हरविलेले आहे, अशा कार्डधारकांची यादी तयार करावी. यादीतील सर्व कार्डधारकांचे प्रमाणपत्र तयार करुन घ्यावेत. तसेच कार्यालयाकडून पुरविण्यात आलेला एक पानी अर्ज कार्डधारकाकडून भरुन घ्यावा. रेशनकार्डकरीता शासकीय शुल्क दुय्यम केशरी शिधापत्रिका चाळीस रुपये, दुय्यम पिवळी विस रुपये तर दुय्यम शुभ्र शंभर रुपये कार्डधारकांकडून घ्यावे. याप्रमाणे सर्व कागदपत्रे जमा झाल्यानंतर अर्ज, दाखला व रेशनकार्ड एकत्र जोडून त्याची यादी तयार करुन सर्व कागदपत्रे तहसिल कार्यालयात जमा करावी व त्यानुसार रक्कम चलनाद्वारे जमा करावी. तद्नंतर  तयार झालेले दुय्यम रेशनकार्ड तलाठी किंवा ग्रामसेवक यांचे समक्ष वाटप करावे.

शिधापत्रिकेत नाव कमी/जास्त करणे: कार्डधारकांच्या कुटूंबातील व्यक्ती मयत झाल्यास अथवा मुलगी लग्न होवून सासरी गेल्यास अशा वेगवेगळया प्रसंगी शिधापत्रिकेतील किंवा कुटूंबातील व्यक्तीची नावे कमी अथवा वाढ करावी लागतात. हे काम करण्याकरीता रास्तभाव दुकानदार यांनी कार्डधारकांकडून  अर्ज, मृत्यू दाखला अथवा जन्म दाखला, कुटूंबातील सर्वांचे आधार कार्डची छायांकीत प्रत याप्रमाणे कागदपत्रे प्राप्त करावी. त्यानंतर सर्व कार्डधारकांची यादी करुन तहसिल कार्यालयात जमा करावी. दुरुस्त झालेले रेशनकार्ड तलाठी किंवा ग्रामसेवक यांचे समक्ष नागरिकाला वितरीत करावे.

रेशनकार्ड तक्रार मुक्त गाव मोहिम राबविण्याकरीता तहसिलदार यांनी त्याचे अधिनस्त रास्तभाव दुकानदार याची सभा घ्यावी. रास्तभाव दुकानदार यांना अभियानाबाबत कार्यपद्धती व्यवस्थितपणे समजावून सांगून योग्य ते मार्गदर्शन करावे. याकरीता जिल्हा पुरवठा अधिकारी यांना आमंत्रित करावे. या मोहिमेची जनजागृती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत करावी. अभियानामध्ये जे गाव रेशनकार्ड तक्रारमुक्त होईल त्या गावच्या रास्त धान्य दुकानदारांना पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार उत्कृष्ठ काम केल्याबाबत पारितोषिक देण्यात येईल. 

अभियान कालावधी दरम्यान मोठया संख्येने अर्ज येण्याची शक्यता लक्षात घेवून तहसिल कार्यालयाने योग्य ते नियोजन करावे. याकरीता अधिकारी किंवा कर्मचारी यांना कामे वाटून द्यावी. मोहिमेतील अर्जाचा निपटारा करण्यास विलंब होणार नाही यांची दक्षता सर्व तहसिलदार व निरीक्षण अधिकारी यांनी घ्यावी, असे आदेशाव्दारे कळविण्यात आले आहे.  

00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ