पत्रपरिषदः महापुरुषांच्या विचारांचा होणार जागर: सामाजिक न्याय विभाग दि.16 पर्यंत राबविणार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम

              अकोला दि.6(जिमाका)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी  जयंती साजरी करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे  दि.6 ते 16 एप्रिल या कालावधीत  सलग 10 दिवस महात्मा जोतीबा फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर  अशा महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यात येणार आहे, याबाबत आज सामाजिक न्याय विभागातर्फे पत्रकार परिषदेत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाची’ माहिती देण्यात आली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. याच वेळी सामाजिक समता कार्यक्रमाची सुरुवातही करण्यात आली. पत्रकार परिषदेस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सहायक आयुक्त समाज कल्याण डॉ. अनिता राठोड, समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद अकोला डी.एम .पुंड, पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अलि मिरसाहेब, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय डांगे तसेच अन्य मान्यवरउपस्थित होते. या वेळी महात्मा जोतिबा फुले,राजर्षि शाहू महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर





   यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा डॉ. राठोड यांनी सांगितली. त्यानुसार सामाजिक समता कार्यक्रमाची सुरुवात दि. 6 एप्रिल रोजी  करण्यात येईल व जिल्हास्तरावर उपक्रमांची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. गुरुवार दि.7 रोजी विभागाच्या सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे, निवासी शाळा आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारीत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा होतील. शुक्रवार दि.8 रोजी जिल्हा व विभाग स्तरावर कार्यक्रम आयोजित करून स्वाधार शिष्यवृत्ती, मिनिट्रॅक्टर आदी लाभार्थींना प्रातिनिधीक स्वरूपात वितरण होईल. शनिवार दि. 9 रोजी ज्येष्ठ नागरिक योजनांच्या जनजागृती संदर्भात मेळावे किंवा तत्सम उपक्रम राबवणे तसेच जिल्हा आरोग्य विभागाच्या समन्वयाने विभागाच्या शैक्षणिक स्थापनांमध्ये रक्तदान शिबीर आयोजित होतील. रविवार दि. 10 रोजी समता दूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात लघुनाट्य, पथनाट्य आदी माध्यमातून विभागाच्या योजनांच्या माहिती बाबत प्रबोधन करण्यात येईल. सोमवार दि. 11 रोजी महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी करून विविध वक्त्यांना निमंत्रित करून महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येईल.मंगळवार दि. 12 रोजी मार्जिन मनी योजनेच्या जनजागृती बाबत तसेच लाभ मिळालेल्या लाभार्थींसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. बुधवार दि. 13 रोजी संविधान जागर हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. गुरुवार दि. 14 रोजी सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व कार्यालये, शाळा, वसतिगृहे इत्यादी सर्व आस्थापनांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी, व्याख्याने, चर्चासत्रे आदी कार्यक्रम घेतले जातील. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारे व्याख्यान आयोजित केले जाईल. याच दिवशी सर्व जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत राहून, जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने वितरीत करतील. शुक्रवार दि. 15 रोजी प्रत्येक सहाय्यक आयुक्त कार्यालयात महिला मेळावे आयोजित करून बाबासाहेबांनी  महिलांविषयी केलेल्या कार्याची माहिती देणारे कार्यक्रम घेतले जातील. तृतीयपंथी जनजागृती व नोंदणी करून ओळखपत्र देण्याचा उपक्रम राबविण्यात येईल. शनिवार दि. 16 या अंतिम दिवशी ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे तसेच वस्त्यांमध्ये विभागाचे लाभ मिळालेल्या व्यक्तींचे मनोगत जाणून घेणे आदी उपक्रम राबवून या समता कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता कार्यक्रम राबविला जाणार आहे.हे सर्व कार्यक्रम यशस्वी करावेत तसेच यात सर्वांनी सहभागी व्हावे ,असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ.अनिता राठोड यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ