पालकमंत्री बेरोजगार नोंदणी पंधरवाडा: रोजगारासाठी युवक युवतींना सर्वतोपरी सहाय्य करा- पालकमंत्री बच्चू कडू

 




             अकोला दि.4(जिमाका)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (दि.14 एप्रिल) ते महाराष्ट्र दिन (1 मे) या कालावधीत जिल्ह्यात गावागावात विविध यंत्रणांच्या मार्फत पोहोचून गावातच बेरोजगारांची नोंदणी करण्यात येणार आहे. या नोंदणीद्वारे प्राप्त माहितीच्या आधारे रोजगाराची आवश्यकता व युवक युवतींमधील कौशल्य यांची सांगड घालून युवक युवतींना रोजगार मिळविण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करावे,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी आज येथे दिले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील शेतकरी सदन येथे  पालकमंत्री  बेरोजगार नोंदणी पंधरवाडा राबविण्यासंदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकीस पालकमंत्री बच्चू कडू यांच्या समवेत उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव तसेच अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.

याबैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, दि.14 एप्रिल ते 1 मे या कालावधीत गावागावात जाऊन बेरोजगार युवक युवतींची नोंदणी करण्यात येणार आहे. आपल्या गावातच करा रोजगार नोंदणी, हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे सुमारे 75 हजार युवक युवतींची नोंदणी होण्याची अपेक्षा आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका आयुक्त, तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रोजगार स्वयंरोजगार, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त,  प्रादेशिक पोलीस ट्रेनिंग स्कूल अकोला यांचे प्राचार्य, यांच्या समन्वयातून हे नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. यावेळी प्रत्येक युवक युवतीकडून एक नमुना भरण्यात येणार असून  त्यात त्यांना आवश्यक रोजगाराचे स्वरुप व त्यानुसार त्यांना करावयाचे मार्गदर्शन यात विभागणी करण्यात येणार आहे.  तसेच ज्यांना स्वयंरोजगाराची आवड आहे अशा युवक युवतींना उद्योग व्यवसायांबाबत माहिती व प्रशिक्षण उपलब्ध करुन देणे व अन्य आवश्यक मार्गदर्शन देण्यात येणार आहे.

या नोंदणी उपक्रमातून कोणताही गरजू बेरोजगार युवक युवती वंचित राहता कामा नये याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी,असे निर्देश यावेळी पालकमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी दिले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ