उन्हाळ्यात पशु व पक्षांची घ्यावयाची काळजी

 सध्या उन्हाळा आहे.तापमान 400 C पेक्षा जास्त झाले आहे. साधारणतः मार्च ते मे महिन्यापर्यंत तापमानाचा पारा  अधिक प्रमाणावर चढतो. या काळात आपण सारे मनुष्य आपल्या आरोग्याची काळजी घेत उन्हापासून बचाव करीत असतो, मात्र हीच बाबत पशुपक्षांसाठी कशी अंमलात आणावी, याची माहिती या लेखातून जाणून घेऊ या.

             कडक उन्हाळ्यातील तापमानाचा जनावरांच्या आरोग्यावर प्रतिकुल परिणाम होतो. हा परिणाम जनावरांच्या आहार, प्रजनन क्षमता आणि दुध उत्पादनावर दिसून येतो. लहान वासरांच्या आरोग्यावर प्रतिकुल परिणाम होऊन त्यांच्या वाढीवर ह्याचा दुष्परिणाम दिसून येतो.

दुधाळ जनावरांची काळजीः-

गाय  व म्हैस या सारख्या दुधाळ जनावरांचे शरीराचे सामान्य तापमान 101 डिग्री F. ते 102 डिग्री F. असते. सर्व उष्ण रक्ताच्या प्राण्यांमध्ये, वातावरणातील तापमानात झालेला जो बदल असतो त्या तापमानाशी जुळवून घेऊन त्यांचे शरीराचे तापमान कायम ठेवण्याची  त्यांच्यात क्षमता  असते. परंतु अतिउष्ण हवामानाचा मात्र आरोग्यावर प्रतिकुल परिणाम दिसून येतो. अशा उष्ण हवामानात शरीरास अतिरिक्त पाण्याची गरज भासते. लहान वासरे,करडे यांच्या शारीरिक वाढीवर दुष्परिणाम होतो आणि ते उष्माघातास किंवा इतर आजारास बळी पडतात.

लक्षणेः-

            दुधाळ जनावरांना एक लिटर दुधासाठी 4 ते 5 लिटर पाण्याची गरज असते. याशिवाय शरीराकरिता सुद्धा पाणी लागते. जनावरांना पिण्यास पाणी कमी पडले तर उष्माघाताची लक्षणे दिसून येतात उदा. ताप, चक्कर अशातऱ्हेने जनावर उष्माघातास बळी पडतात. बाहेरील वातावरणाचे तापमान शारीरिक तापमानापेक्षा जास्त असल्यामुळे बाहेरील उष्णता शरीरात शोषली जाते व शारीरिक तापमान स्थिर राहु शकत नाही. विदेशी संकरीत गाईम्हशी यांना या उन्हाळ्यातील उष्णतेचा अधिक त्रास होतो.

उपाययोजनाः- जनावरांना बांधण्याची जागा गोठा’ सावलीत असावा. सावलीसाठी हिरवे कापडाचे शेड बांधावे. शक्यतो जनावरांना झाडाच्या सावलीत थंड जागी बांधावे. शक्य असल्यास गोठ्यात कुलर किंवा पंखा लावावा जेणेकरून जनावरांचे शारीरिक तापमान कायम राहण्यास मदत होते. त्यासाठी  गोठ्याच्या सभोवताल सावली देणारे वृक्ष असावीत,असे नियोजन करणे आवश्यक आहे. त्याचा फायदा उन्हाळ्यात होतोच. जनावरांच्या अंगावर थंड पाण्याचे फवारे फवारावे, अंगावर ओले पोते टाकावेत, उन्हाच्या आत जनावरे चरून येतील असे नियोजन करावे. मात्र रात्रीच्या वेळी जनावरे गोठ्या बाहेर मोकळ्या जागेत बांधल्यास थंडावा मिळतो. रात्री बाहेरील तापमान गोठ्यातील तापमानापेक्षा कमी असते. हवा मोकळी असते. उन्हाळ्यात शेत  ओसाड असतात कुठेही चारा उपलब्ध नसतो, अशावेळी जनावरांना रात्री किंवा पहाटे चारा उपलब्ध करून दिल्यास ते अधिक चाराखाऊ शकतील. ऊर्जा कमी खर्च होईल. दुध देण्याचे प्रमाण कमी होणार नाही.

            संकरीत जनावरांना उष्णतेचा अधिक त्रास होतो. म्हणून त्यांची विशेष काळजी घ्यावी. शेडवर पाण्याचा फवारा देण्याकरिता स्प्रिंकलरची व्यवस्था करावी. बाहेरील गरम हवा आत थंड होऊन जाईल. शेडला सच्छिद्र कापडाचे पडदे लावावे. जेणे करून गोठ्यात थंडावा राहील.

            शेळ्यांच्या बाबतीत सुद्धा अशाच पद्धतीने दक्षता घेणे आवश्यक आहे. गाभण शेळ्या, लहान करडे यांच्या शेडमध्ये सुद्धा थंडावा राखावा. पिण्यास थंड पाणी द्यावे. त्यांच्या लहान करडाना उन्हात बाहेर सोडू नये. मोठ्या शेळ्या सकाळी चरावयास सोडाव्या व उन्हाच्या आधी गोठ्यात परत येतील ही काळजी घ्यावी.

आहाराबाबत घ्यावयाची काळजी-:

उन्हाळ्यात हिरवा चारा आपल्याकडील जनावरांना उपलब्ध होऊ शकत नाही. हे टाळण्यासाठी पावसाळा व रब्बी हंगामात मुबलक तयार चारा पीक फुलोऱ्यावर आले असतांना कापणी करून साठवावे. तसेच वाढलेल्या

चाऱ्याची साठवण करून ठेवावी. ताजे गवत किंवा चारा उपलब्ध होईपर्यंत पुरवावे. गव्हाचे पीक आल्यावर गव्हांडावर युरिया ची प्रक्रिया करावी. त्याचा चाऱ्यासाठी वापर करावा. तसेच उन्हाळ्याकरिता मुरघास हाच उत्तम पर्याय आहे. मुरघाससाठी योग्य चारा लागवडीचे नियोजन पावसाळ्यातच करावे. या करिता चारा तृण धान्य व मका, ज्वारी, बरसीम, लुसर्न, सोयाबीन या एकदल जातीचे पीक वापरता येतात. हा मुरघासच्या पिशव्या  उन्हाळ्यात उघडून  पौष्टिक चारा म्हणून वापरता येतो. या करिता मुरघास तयार करण्याची पद्धत जाणून घ्यावी. हा चारा हवा बंद स्थितीत कमीतकमी 90 दिवस ठेवावा लागतो.

वातावरणातील बदल व अनियमित पाऊस यामुळे पावसाळ्यानंतर ही नियमित पणे हिरवा चारा मिळेलच असे नाही. उन्हाळ्यात चारा टंचाई भासते. शेळ्या,मेंढ्या,इतर मोठी जनावरा करिता चारा उपलब्ध नसतो. यावर उपाय म्हणून झाडपाल्याचा वापर चारा म्हणून करता येतो. उदा.  सुबाभूळ, अंजनी, गिरिपुष्प अशी झाडे जर उपलब्ध असली तर महागड्या हिरव्या चाऱ्याला एक चांगला पर्याय आहे. बांध्यावर, पाटाच्या दिशेने यशवंत, जयवंत, DHN 6 सारखी चारा पीके लावावीत. उन्हाळ्यात क्षार मिश्रणाच्या चाटण विटा द्याव्यात. गव्हाचा कोंडा ,भाताच्या पेंडीवर मीठ ,युरिया ची प्रक्रिया करावी. यामुळे त्याची पोषकता व पाचकता वाढते.

कोंबड्यातील उष्माघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी :-

कुक्कुट पालन करणाऱ्या पक्षीपालकांना सुद्धा उन्हाळ्यात आर्थिक फटका बसतो. इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत कोंबडी हा पक्षी  अधिक प्रमाणात उष्माघातास बळी पडतो. त्यामुळे प्रत्यक्षपणे मांसल व अंडी उत्पादनात घट होते. 30 डिग्री से. ते 35 डिग्री से. पर्यंतचे तापमान कोंबड्या सहन करू शकतात. विदर्भ,मराठवाडा, खान्देश येथील मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत मात्र त्यांना उष्णतेचा त्रास होतो. या उच्च तापमानाचा कोंबड्यांच्या शारीरिक क्रियेत  बदल होतो. त्या उष्माघातास बळी पडतात. मानवाप्रमाणे जास्त उष्णतेला प्रतिसाद देण्यासाठी कोंबड्यांना घर्म ग्रंथी नसतात. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तोंडाची उघडझाप करतात. यास धापा टाकणे असे म्हणतात (panting). जास्त प्रमाणात धापा टाकल्यामुळे त्यांच्या शरीरातील उष्णता बाहेर टाकली जाते. परंतु सततची उघडझाप केल्यामुळे कोंबड्यांच्या शरीर क्रियेत रासायनिक बदल होतात.आणि कोंबड्या उष्माघातास बळी पडतात. म्हणूनच कोंबड्यां चे उन्हाळ्यातील व्यवस्थापन करणे अत्यंत महत्वाचे आहे.

1.      शेड मध्ये हवा खेळती राहील असे पूर्व पश्चिम शेड बांधणीची रचना करावी.

2.      उन्हाळा सुरु होण्या पूर्वी छताची सफाई करून पांढऱ्या रंगाने रंगवावे.

3.      छतावर वाळलेल्या गवताने झाकावे व दिवसातून 3 ते 4 वेळा पाणी फवारावे. यामुळे शेड मधील तापमान कमी होण्यास मदत होईल. शेडमध्ये थंडावा राहील.

4.    शक्य असल्यास शेड मध्ये पंख्याचा वापर करावा.,एक्झॉस्ट पंखा लावावा.जेणेकरून शिळी हवा बाहेर जाईल.

5.     शेडमध्ये पिण्याच्या पाण्याची भांडी वाढवावी.

6.     पक्षांचे खाद्य सकाळी व संध्याकाळी द्यावे,उन्हाच्या वेळेत खाद्य टाकू नये.

7.     दुपारी थंड पाणी ,विटामिन C.,B,इलेक्ट्रोलिटस ,ग्लुकोज असे पाण्यातून देण्यात यावे.

8.     उन्हाळ्यातील दिवसात मांसल पक्षांना खाद्यात पूरक क्षार प्रमाणात  दिले तर त्यांची पाणी पिण्याची क्षमता वाढते.

9.      कोंबड्यांच्या आहारात जीवनसत्वे व खनिज द्रव्यांचे प्रमाण वाढवावे.

10.  शेड मध्ये पक्षांची गर्दी होणार नाही, अशा रीतीने पक्षी ठेवावे.

11.   उन्हाळ्यात लसीकरण पहाटेच्या वेळेत करावे. लसीची साठवण थंड ठिकाणी करावी ,जेणेकरून लस खराब होणार नाही.

उन्हाळ्यात कोंबड्यातील उष्माघात टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे उष्माघात विषयक लक्षणे दिसताच तात्काळ जवळच्या पशुवैद्यकांशी संपर्क साधावा.

-डॉ. नम्रता सुनील वाघमारे

(लेखक सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन ) या पदावर विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा,अकोला येथे कार्यरत आहेत.)

-संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, अकोला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ