राज्याच्या कृषी विभागाला जैविक इंडिया पुरस्कार

 

डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची अंमलबजावणी 

 राज्याच्या कृषी विभागाला जैविक इंडिया पुरस्कार   

अकोला, दि. 11 : डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनच्या अंमलबजावणीसाठी बंगळुरू येथील इंटरनॅशनल कॉम्पिटन्स सेंटर फॉर ऑरगॅनिक ॲग्रीकल्चर यांच्यातर्फे राष्ट्रीय स्तरावरील दुस-या क्रमांकाचा ‘जैविक इंडिया ॲवार्ड 2023’ राज्य शासनाच्या कृषी विभागाला नुकताच दिल्ली येथील समारंभात प्रदान करण्यात आला. ‘आत्मा’चे कृषी संचालक दशरथ तांभाळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.   

 अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा या विदर्भातील आत्महत्याग्रस्त/नैराश्यग्रस्त 6 जिल्ह्यात वर्ष 2018-19 पासून डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजनेत 9 हजार 268 शेतकऱ्यांचे 15 हजार 682 हे. क्षेत्र  सेंद्रिय प्रमाणिकरणाखाली आणण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, 20 हे. क्षेत्राचे 435 गट स्थापन करण्यात आले असून त्या गटांच्या 40 शेतकरी उत्पादक कंपन्या आणि त्यांचा महासंघ स्थापन करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे एकूण रु. 2.82 कोटी भागभांडवल जमा झाले आहे. योजनेत 12 किरकोळ विक्री केंद्र, 17 समूह संकलन केंद्र, महासंघ ऑरगॅनिक मिशन (MOM) नावाचा ब्रँड तयार करण्यात आला असून या ब्रँडच्या नावाने सेंद्रिय शेतमालाची विक्री करण्यात येते.

*आता राज्यभर लागू*…

‘डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन’ योजना कार्यक्षेत्र विस्तारून दि. 27 जून रोजीच्या शासन निर्णयान्वये संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात आली आहे. योजनेचा कालावधी 2028 पर्यंत वाढविण्यात आला आहे. योजनेअंतर्गत तीन वर्षात राज्यात 13 लाख हे. नैसर्गिक व सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे.

 समूह संकल्पनेद्वारे 18 हजार 820 उत्पादक गट व 1 हजार 825 शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. नैसर्गिक सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जैवनिविष्ठा संसाधन केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. राज्यातील कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीवरील संशोधन व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

नैसर्गिक सेंद्रिय शेती योजनेचा लाभ घेण्यासाठी नजिकच्या तालुका कृषी अधिकारी अथवा जिल्हास्तरावर प्रकल्प संचालक, आत्मा यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आत्मा कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

 000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ