ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी

प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

अकोला, दि. 26 : पुढील वर्षात मुदत संपणा-या व नव्याने स्थापित होणा-या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तालुका व ग्रा. पं. स्तरावर ठळक प्रसिद्धी करावी व टप्पेनिहाय अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिका-यांना दिले आहेत. जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत मुदत संपणा-या व नव्याने स्थापित ग्रा. पं. निवडणुकांसाठी हा कार्यक्रम अंमलात येत आहे.

कार्यक्रमानुसार, तहसीलदारांनी गुगल अर्थचे नकाशे सुपरइंपोज करून प्रत्येक गावाचे नकाशे दि. 6 ऑक्टोबरपर्यंत अंतिम करण्याचे आदेश आहेत. तलाठी व ग्रामसेवकांना दि. 16 ऑक्टोबरपूर्वी संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग सीमा निश्चित करण्याचे आदेश आहेत. त्यानंतर तहसीलदार, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी यांचा समावेश असलेली समिती प्रभाग रचनेची तपासणी करेल. रचनेचा प्रस्ताव दि. 3 नोव्हेंबरपूर्वी उपविभागीय अधिका-यांमार्फत जिल्हाधिका-यांकडे पाठविण्यात येईल.

जिल्हाधिका-यांकडून तपासणीनंतर राज्य निवडणूक आयोगाकडे किंवा त्यांनी नेमलेल्या प्राधिकृत अधिका-यांकडे पाठविण्यात येईल. आयोगाच्या तपासणीनंतर आवश्यक दुरुस्त्या करून तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समिती रचनेला दि. 28 नोव्हेंबरपूर्वी मान्यता देईल. त्यानंतर रचनेची प्रसिद्धी करून हरकती व सूचना मागविण्यात येईल. प्राप्त हरकती व सूचनांवर निर्णय घेऊन प्रभाग रचना अंतिम करून दि. 9 जानेवारी 2024 पूर्वी आयोगाला सादर केली जाईल. आयोगाच्या मान्यतेनंतर दि. 16 जानेवारीपूर्वी अंतिम रचना प्रसिद्ध करण्यात येईल.

जिल्ह्यात पुढील वर्षात मुदत संपणा-या एकूण 19 ग्रामपंचायती आहेत. त्यात तेल्हारा तालुक्यातील उमरी, अकोली रूपराव, अकोट तालुक्यातील केळपाणी, मूर्तिजापूर तालुक्यातील कव्हळा, शेलू बाजार, किनखेड, लंघापूर, बाळापूर तालुक्यातील हिंगणा निंबा, शिंगोली, बार्शीटाकळी तालुक्यातील भेडीसूत्रक, चोहोगाव, पातूर तालुक्यातील सांगोळा, कोठारी बु., आस्टुल, भंडारज बु., तुलंगा बु., अकोला तालुक्यातील आखतवाडा, अनकवाडी, मजलापूर आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ