वैद्यकीय महाविद्यालयाला कार्डियाक रुग्णवाहिकेची देणगी

 

     


डॉ. शकुंतला गोखले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे

वैद्यकीय महाविद्यालयाला कार्डियाक रुग्णवाहिकेची देणगी

जिल्हाधिका-यांचे हस्ते रुग्णवाहिका सुपुर्द

अकोला, दि. 18 : डॉ. शकुंतला गोखले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला कार्डियाक रुग्णवाहिकेची देणगी देण्यात आली. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते आज रूग्णवाहिका महाविद्यालयाला सुपुर्द करण्यात आली.

महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी जिल्हाधिका-यांच्या हस्ते रूग्णवाहिकेचा स्वीकार केला. महाविद्यालयातील विभागप्रमुख, डॉक्टर, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. महाविद्यालयाला डॉ. शकुंतला गोखले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोलाची मदत मिळाली आहे. ही रुग्णवाहिका रुग्णसेवेच्या कार्यात उपयुक्त ठरणार आहे, असे यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी यावेळी सांगितले. 

हृदयरोगाशी संबंधित रुग्णाला ने-आण करण्यासाठी सर्व वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध असणारी कार्डियाकॲम्बुलन्स रुग्णालयाकडे असणे अत्यंत आवश्यक होते. ती प्राप्त झाल्याने रुग्णसेवेचा दर्जा निश्चित उंचावेल, असे डॉ. गजभिये यांनी सांगितले.

आरोग्यविषयक कार्यक्रमांत अनेक सेवाभावी संस्था शासनाला सहकार्य करतात. डॉ. शकुंतला गोखले चॅरिटेबल ट्रस्ट अशा अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांत नेहमी अग्रक्रमावर असतो, असेही डॉ. गजभिये यांनी सांगितले.

अकोला जिल्ह्याची कन्या असलेल्या उच्च विद्याविभूषित डॉ. शकुंतला गोखले यांच्या स्मृतीनिमित्त समाजसेवा या एकमेव उद्देशासाठी या ट्रस्टची स्थापना करण्यात आली. डॉ. शकुंतला गोखले यांचा जन्म दोन जुलै 1938 रोजी वाशीम येथे झाला. त्यांच्या वडलांचे नाव नागेश केशव गोखले आणि आईचे नाव गंगाबाई गोखले असे होते. १९५४ साली गव्हर्नमेंट मल्टिपर्पज हायस्कूल मध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९६१ साली त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथून वैद्यकीय पदवी प्राप्त केली.  १९६३ साली नेत्रशल्य चिकित्सा शास्त्रात कॉलेज ऑफ फिजीशियन अँड सर्जन मुंबई येथून डिओएमएस पदव्युत्तर शिक्षण प्राप्त करुन १९६५ साली मुंबई विद्यापीठातून  एम. एस ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर एफआरसीएस होण्याचे आपले स्वप्न त्यांनी पूर्ण केले.

त्यांनी भारतात आणि इंग्लंड येथील अत्यंत प्रतिष्ठित आयुर्विज्ञान संस्थांमध्ये सेवा दिली. स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या आणि कर्तृत्वाच्या बळावर अकोला येथील या कन्येने वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत देशात आणि परदेशात आपली ओळख निर्माण केली. त्यांचे  २२ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांच्या नावाने सुरू करण्यात आलेला ट्रस्ट अनेक समाजोपयोगी उपक्रमात नेहमीच अग्रक्रमावर राहिलेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्रशल्य चिकित्सा विभागाला यापूर्वी त्यांची मदत लाभली आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ