अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात चार मतदान केंद्रांची वाढ प्रस्तावित

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात

चार मतदान केंद्रांची वाढ प्रस्तावित

अकोला, दि. 28 : विशेष संक्षिप्‍त पुनरीक्षण कार्यक्रमात अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील 347 मतदान केंद्रांची पाहणी करण्यात आली. त्यात मतदारांची संख्या वाढल्याने चार मतदान केंद्रांची वाढ प्रस्तावित आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी दिली.

विशेष पुनरीक्षण कार्यक्रमात नविन मतदार नोंदणी सुरु असून, त्यात विशेष शिबिरे आयोजित करण्‍यात येत आहेत. मतदारसंघातील 347 मतदान केंद्रांच्या पाहणीअंती दीड हजारांहून अधिक मतदार असलेल्या केंद्रांचे दोन भाग करण्याचा प्रस्ताव करण्यात आला. त्यानुसार चार केंद्रे नव्याने निर्माण करणे प्रस्तावित आहे.  

          त्यात भौरद येथील मांगीलाल शर्मा विद्यालय खोली क्र 4 या मतदान केंद्र क्र. 234 मधील मतदार संख्‍या दीड हजारांवर जाण्‍याची शक्‍यता लक्षात घेऊन केंद्राचे विभाजन करुन 234 व 235 ही नवी केंद्रे प्रस्तावित आहेत. मांगीलाल शर्मा कनिष्ठ महाविद्यालय खोली क्र 1 या केंद्र क्र. 236 मधील मतदार संख्‍या वाढल्याने क्र. 237  व 238 ही केंद्रे प्रस्तावित आहेत.

मांगीलाल शर्मा कनिष्ठ महाविद्यालय खोली क्र 2 म.केंद्र क्रमांक 237 चे विभाजन करुन 239  व 240 ही केंद्रे तयार होतील. त्याचप्रमाणे, मांगीलाल शर्मा विद्यालय खोली क्र. 5 म.केंद्र क्रमांक 241 चे विभाजन करून 244  व 245 ही केंद्रे प्रस्तावित आहेत. 

मतदान केंद्रांच्या सुसुत्रीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यापूर्वी मतदारसंघांतर्गत सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची सभा आयोजित करण्यात आली व त्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. चार मतदान केंद्रांच्या वाढीस निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतर अकोला पूर्व मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या 351 होईल, असे डॉ. जावळे यांनी सांगितले.

०००

 

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ