स्वयंरोजगारासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचे पाठबळ

अकोला, दि. 13 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचे पाठबळ मिळाल्याने बाळापूर तालुक्यातील एका युवकाला स्वयंरोजगार प्राप्त होऊन तो यशस्वीपणे  व्यवसाय करत आहे.

मराठा समाज व स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नसलेल्या प्रवर्गासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्यातील वैयक्तिक कर्ज परतावा योजनेचा लाभ घेऊन गजानन बाबुराव ठाकरे हे मालवाहू वाहनाचा व्यवसाय यशस्वीपणे करत आहेत.

 

                श्री. ठाकरे हे बाळापूर तालुक्यातील कळंब बु.कसुरा येथील रहिवाशी आहेत. घरात आर्थिक टंचाई नेहमी जाणवत असल्याने ते नोकरी अथवा व्यवसायाच्या शोधात होते. याचदरम्यान त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाबद्दल माहिती मिळाली. त्यातील वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना हा पर्याय त्यांना योग्य वाटला.

दैनंदिन मजुरीवर चारचाकी मालवाहक गाडी चालवण्याचा अनुभव असल्याने मालवाहक गाडीचा व्यवसाय त्यांनी निवडला. तसा निश्चय होताच श्री. ठाकरे यांनी महामंडळाकडे अर्ज केला. महामंडळ, तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्या दिशानिर्देशानुसार श्री. ठाकरे यांनी योग्य त्या कागदपत्रांसह कर्ज प्रकरण जिल्हा कार्यालयात जमा केले.  इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेच्या मुख्य शाखेतर्फे श्री. ठाकरे यांना 7 लाख 80 हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. त्याच्या साह्याने श्री. ठाकरे यांच्या श्री गजानन गुड्स अँड करिअर व्यवसायाची यशस्वी सुरूवात झाली.  

 आज त्यांचा मालवाहक गाडीचा व्यवसाय सुरळीतपणे सुरु आहे. दरमहा बँकेने ठरवून दिलेला ईएमआय व्याजासह अदा करून बँकेची व्याज रक्कम महामंडळातर्फे त्यांना नियमित व्याज परतावा स्वरूपात मिळत आहे. यासाठी कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त द.ल. ठाकरे  अधिकारी ग.प्र.बिटोडे आणि महामंडळाचे  जिल्हा समन्वयक रोहित बारस्कर यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.

वैयक्तिक व्याज परतावा योजनेची मर्यादा 10 लाखांहून 15 लाख रू. पर्यंत वाढविण्यात आली आहे. महामंडळामार्फत 4.5 लाखाच्या व्याज मर्यादेत परतावा करण्यात येईल. सदर व्याज परतावा कालावधी जास्तीत जास्त 7 वर्षे व व्याजाचा दर द. सा. द. शे. 12 टक्के आहे.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम