गणेशोत्सव परवानग्यांसाठी  10 दिवस आधी ‘एक खिडकी’ सुरू होणार  

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततामय मार्गाने साजरा करावा

-         जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. 1 :  गणेशोत्सवाच्या अनुषंगाने रस्ते, पथदिवे दुरूस्ती, वीजपुरवठ्यात सुधारणा आदी बाबी प्राधान्याने पूर्ण केल्या जातील. आवश्यक परवानग्यांसाठी एक खिडकी योजना दि. 9 सप्टेंबरला सुरू करण्यात येईल. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततामय मार्गाने साजरा व्हावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.   

गणेशोत्सवाबाबत विविध मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. अध्यक्ष संगीता अढाऊ, आमदार रणधीर सावरकर, आमदार नितीन देशमुख, आमदार वसंत खंडेलवाल, पोलीस अधिक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, संग्राम गावंडे, ॲड. मोतीसिंह मोहता, सिद्धार्थ शर्मा यांच्यासह अनेक मंडळांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी विविध मंडळांची निवेदने व मागण्या जाणून घेण्यात आल्या. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची, पथदिव्यांची दुरूस्ती पूर्ण करण्यात येईल. विसर्जन मार्गावर दिवे, पेयजल, आरोग्य सुविधा व इतर सुविधा उभारण्यात येतील. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींनी ही कार्यवाही वेळेत पूर्ण करावी. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक कार्यवाही पोलीसांकडून करण्यात येईल. ‘महावितरण’कडून गणेशोत्सव कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा. मार्गात अडथळा करणा-या वीजतारा सुरक्षित उंचीवर न्याव्यात. मंडळांच्या मागण्यांनुसार सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात येईल. आस्थापनांना वेळ वाढवून देणे आदी सूचनांबाबतही तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू. गणेशोत्सव शांततेत व पर्यावरणपूरक साजरा होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

शासनाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत जिल्ह्यातील अधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. गणेशोत्सव कालावधीत दुसरा दिवस (20 सप्टेंबर), पाचवा दिवस (23 सप्टेंबर) व अनंत चतुर्दशी (28 सप्टेंबर) या तीन दिवशी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 ते रा. 12 पर्यंत ध्वनीक्षेपक, ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्याबाबत पर्यावरण विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे.

 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ