भरडधान्याची पशुआहारातील उपयोगिता : क्षमता व भविष्यवेध अकोल्यात गुरूवारपासून दोनदिवशीय राष्ट्रीय चर्चासत्र

 

भरडधान्याची पशुआहारातील उपयोगिता : क्षमता व भविष्यवेध

 

अकोल्यात गुरूवारपासून दोनदिवशीय राष्ट्रीय चर्चासत्र

 

अकोला, दि. 5 : आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाचे औचित्य साधत महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या पशुपोषण विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेतर्फे ‘भरडधान्याची पशुआहारातील उपयोगिता : क्षमता व भविष्यवेध’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्र दि. 7 व 8 सप्टेंबर रोजी मूर्तिजापूर रस्त्यावरील सिटी स्पोर्टस् सेंटर येथे होणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे यांनी दिली.

इज्जतनगर, बरेली येथील ॲनिमल न्यूट्रिशन असोसिएशनचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले आहे. चर्चासत्राचा शुभारंभ गुरूवारी सकाळी 9 वाजता होईल. आमदार रणधीर सावरकर, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, बरेली येथील भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्थानचे संचालक डॉ. त्रिवेणी दत्त यांच्यासह अनेक मान्यवर उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहतील.

          पशुपोषणात चारानिर्मितीसाठी भरडधान्य लागवडीसाठी शेतकरी बांधवांमध्ये प्रचार व प्रसार व्हावा व भरडधान्यापासून आरोग्यवर्धक पदार्थ निर्मिती या उद्देशाने परिसंवादात देशपातळीवरील नामवंत तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. शेतकरी-शास्त्रज्ञ व उद्योजक संवादाचे आयोजनही यावेळी करण्यात आले आहे.

चर्चासत्रानिमित्त अकोला येथील ‘महाबीज’  व पुणे येथील ‘बाएफ’ यांच्या सहकार्याने भरडधान्य बियाण्यांचे व देशी वाणांचे प्रदर्शन यावेळी घेण्यात येईल. त्याचप्रमाणे, नागपूर येथील ‘व्हीएनआयटी’च्या वतीने भरडधान्यांच्या मानवी आहारात उपयुक्त पदार्थांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे.

पशुवैद्यक, पशुपोषण अभ्यासक व विद्यार्थ्यांसाठी हे दोन दिवशीय चर्चासत्र पर्वणी ठरणार असून, सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पशुपोषण विभागप्रमुख डॉ. कुलदीप देशपांडे यांनी केले.

                                            ०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ