कपाशीवरील तुडतुडे आणि फुलकिडयांचे व्यवस्थापन

 अकोला,दि.21 (जिमाका)- जिल्हयात मागील 10 ते 12 दिवसांपासून पडत असलेला रिझिम पाऊस, अधूनमधून तापणारे उन आणि ढगाळ वातावरण तुडतुडयांच्या प्रादुर्भावास पोषक असून कपाशी पिकावर तुडतुडयांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तुडतुडे पाचरीच्या आकाराचे, फिक्क्ट हिरव्या रंगाचे असून तिरकस चालतात. प्रोढ तुडतुडे आणि पिल्ले पानाच्या खालच्या बाजूस राहून रस शोषतात त्यामुळे सुरुवातीस पानांच्या कडा पिवळसर पडतात. पाने आतल्या बाजुने वळतात. काही दिवसांनी पानांच्या कडा लालसर होतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास झाडाची पूर्ण पाने लाल होतात आणि जळल्यासारखी दिसतात. यालाच हॉपर बर्न असेही म्हणतात.

            काही ठिकाणी कपाशीवर फुलकिडयांचा देखील प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. फुलकिडयांचे प्रौढ आणि पिल्ले पानांच्या मागील बाजूस शिरेजवळ राहून पान खरवडून त्यातून निघणारा रस शोषण करतात. फुलकिडयांनी रखडलेल्या भागावर पांढुरके चट्टे पडतात.उन्हात तो भाग चमकतो. प्रादुर्भावग्रस्त भागातील पानांच्या पेशी शुष्क होतात. पाने वरच्या बाजूस वळतात आणि लांबट दिसतात. खूप जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने कडक होतात आणि फाटतात. पात्या आणि बोंडावरही प्रादुर्भाव दिसून येतो. झाड निस्तेज दिसते आणि वाढ मंदावते. कपाशीवरील तुडतुडे आणि फुलकिड्यांच्या व्यवस्थापनाकरीता खालील प्रमाणे योजना करावी.

            नत्र खताचा वापर शिफारशीनुसारच करावा. अवास्तव वापर टाळावा. पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा अझाडीराक्टीन 1500 पिपिएम 50 मिली किंवा अझाडीराक्टीन 3000 पीपीएम 40 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  आठवड्यातून किमान एक वेळा पिकाचे सर्वेक्षण करावे. किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठल्यासच (2 तुडतुडे प्रती पान, 10 फुलकिडे प्रती पान) रासायनिक व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. त्याकरीता प्राफेनोफॉस 50 इसी मिली (एकरी 400 मिली) किंवा बुप्रोफेझीन 25 एस सी 20 मिली (एकरी 400 मिली) किंवा प्लोनिक अमीड 50 डब्ल्यू डी जी 4 ग्राम यापैकी कोणत्याही एका कीटक नाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ व कृषि विज्ञान केंद्र डॉ. चारुदत्त ठिपसे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ