आधार सेवा केंद्रांवरील सेवांचे दर निर्धारीत; अतिरिक्त शुल्क देऊ नका- निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे

 


अकोला, दि.१२(जिमाका)- नागरिकांना देण्यात येणार आधार ओळखपत्र देण्यासाठी आधार सेवा केंद्र कार्यरत आहेत. याठिकाणी देण्यात येणाऱ्या सेवांसाठी विहित दरापेक्षा अतिरिक्त शुल्क देऊ नये, तसेच दिलेल्या शुल्काची पावती घ्यावी व पावती देत नसल्यास शुल्क देऊ नये. अशा प्रकारे शुल्क आकारले जात असल्यास तशी रितसर तक्रार करावी,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा सचिव जिल्हा सेतू समिती संजय खडसे यांनी केले आहे.  

यासंदर्भात देण्यात आलेली माहिती अशी की, जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला अंतर्गत आधार नोंदणी व दुरुस्ती साठी UIDAI, क्षेत्रीय कार्यालय मुंबई यांचे नियमानुसार नागरिकांना सेवा प्रदान करण्यासाठी 'आधार सेवा केंद्र' कार्यरत आहे, त्याद्वारे Online पद्धतीने नागरिकांचे आधार कार्ड बनविण्यासाठी बायोमेट्रिक माहिती (फिंगर प्रिंट,आयरीस व डेमोग्राफिक माहिती) नागरिकांची कागदपत्रे स्कॅन करून UIDAI, क्षेत्रीय कार्यालय मुंबई यांना पाठविण्यात येते.

                        UIDAI, क्षेत्रीय कार्यालय मुंबई येथे नागरिकांच्या बायोमेट्रिक व डेमोग्राफिक माहिती तसेच डेटा गुणवत्ता पडताळून नवीन आधार कार्ड वा अस्तित्वात असलेल्या आधार कार्डाच्या तपशिलत दुरुस्ती केली जाते. नागरिकांनी नवीन आधार कार्ड तसेच दुरुस्ती झाल्यानंतर आधार सेवा केंद्रावरून अथवा https://uidai.gov.in या संकेतस्थळावरून आपले आधार प्राप्त करून घ्यावयाचे असते.

                        नवीन आधार नोंदणी व आधार दुरुस्तीसाठी UIDAI, क्षेत्रिय कार्यालय मुंबई यांच्या नियमानुसार आकारण्यात येणारे शुल्क व आधार प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी लागणारा कालावधी याप्रमाणे असतो-

1)नवीन आधार नोंदणी- निःशुल्क, 2) अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट- निःशुल्क, 3) बायोमेट्रीक अपडेट- 100 रुपये, 4) डेमोग्राफिक अपडेट-50 रुपये. या सर्व सेवांसाठी लागणारा कालावधी 20 दिवस इतकाच असतो.

                याप्रमाणे नमूद केलेल्या सेवांसाठी व सेवांव्यतिरिक्त आधार नोंदणी करिता कोणतेही अतिरिक शुल्क देण्याची आवश्यकता नसते. तरी नागरिकांनी विहित केलेल्या दरापेक्षा कोणतेही शुल्क अदा करु नये. जे शुल्क आकारले जाते त्याची पावती अवश्य घ्यावी. पावती दिली जात नसेल तर शुल्क देऊ नये. तसेच आधार सेवा केंद्र चालक अथवा कोणीही जास्त रक्कम आकारत असल्यास त्याबाबतची रीतसर तक्रार तहसिल कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयाकडे करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा सचिव जिल्हा सेतू समिती संजय खडसे यांनी केले आहे.  असे जिल्‍हा प्रशासनाव्‍दारे आवाहन करण्यात येत आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ