पावसामुळे आतापर्यंत चार मृत्यू;72 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान


अकोला दि.22(जिमाका)- जिल्ह्यात दि. 1 जून ते 21 जुलै या कालावधीत झालेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीत चार जणांचा मृत्यू झाला तर आतापर्यंत 72 हजार 36 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती नैसर्गिक आपत्ती कक्षातून प्राप्त झाली.

प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात दि. 21 जुलैपर्यंत 355.1 मि.मी. (51.6 टक्के)  पावसाची नोंद झाली. अतिवृष्टी, वीज, वादळामुळे जिल्ह्यातील  चौघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये निंबी ता. बार्शी टाकळी येथील सतिश भाऊराव सिरसाट (वय-33वर्षे) यांचा वादळामुळे, मजलापूर ता.अकोला गावातील शेख इसामुद्दीन शेख इकरामुद्दीन (वय-65वर्षे) यांचा वीज पडून मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना प्रत्येकी चार लक्ष रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर आलेगाव ता. पातूर येथील वसंता माधव तेलगोटे (वय-70 वर्षे) यांचा वीज पडून तर दुर्गा चौक, अकोला येथील सुधीरसिंग रोहेल (वय-27 वर्षे) यांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. त्यांच्या मदतनिधी वाटपाची प्रक्रिया सुरु आहे.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 222 घरांचे अंशत: तर दोन घराचे पुर्णत: नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तालुकास्तरावर पंचनामे व मुल्यांकनाची कार्यवाही सुरु आहे. वीज व अतिवृष्टीचा जनावरांनाही फटका बसला असून जिल्ह्यात 11 जनावरांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात 72 हजार 36 हेक्टर आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात कापुस, सोयाबीन, ज्वारी, मुंग, उडीद, भाजीपाला या पिकांचा समावेश आहे. अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतपिके व खरवडून गेलेल्या शेत जमिनीचे पंचनामे व सर्व्हेक्षणाची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ