मतदारयादीतील तपशील आधारशी जोडण्यास 1 ऑगस्टपासून सुरूवात; ऑनलाईनव्दारे करता येणार आधार संलग्न


अकोला दि.25(जिमाका)- निवडणूक मतदारयादीतील मतदारांच्या तपशिलाशी आधारची माहिती संग्रहित करण्याचा कार्यक्रम व्यापक स्वरूपात दि. 1 ऑगस्ट 2022 पासून करण्यात येणार आहे. मतदारांनी आधार क्रमांक सादर करणे ही बाब ऐच्छिक राहणार आहे. त्यामुळे आधार क्रमांक लिंक केले नसल्यास मतदारयादीतून नाव वगळल्या जाणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली.

मतदारांची ओळख प्रस्थापित करणे आणि मतदारयादीतील नोंदींचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीची नावनोंदणी ओळखणे यासाठी मतदार ओळखपत्रासोबत आधार क्रमांक लिंक केल्या जाणार आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी दि. 1 ऑगस्ट 2022 पासून व्यापक प्रमाणात करण्यात येणार आहे. मतदार नोंदणी अधिकारी यांना मतदारयादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहित नमुन्यात आधार क्रमांक घरोघरी जावून वा विशेष शिबीराव्दारे माहिती गोळा करण्यात येणार आहे. मतदारांना त्यांच्या आधार क्रमांक भरण्सासाठी नमुना अर्ज क्र. 6 ब तयार करण्यात आला आहे. अर्ज क्र. 6 ब भारत निवडणूक आयोगाच्या cci.gov.in व मुख्य  निवडणूक    अधिकारी https://ceoelection.maharashtra.gov.in  या  संकेत स्थळावर उपलब्ध आहे. मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6 ब GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध असेल.  तसेच अर्ज क्र. 6 ब च्या छापील प्रती देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

            ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्याची सुविधा पोर्टल, ॲपच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्याच्या दोन पद्धती असतील. स्व-प्रमाणीकरणाच्या माध्यमातून भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या पोर्टल, ॲपच्या माध्यमातून मतदार ऑनलाईन पद्धतीने अर्ज क्र. 6 भरुन आधार क्रमांक नोंदवू शकतील. तसेच स्व-प्रमाणीकरणाशिवाय ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरुन त्यामध्ये दर्शविलेल्या 11 पर्यायी कागदपत्रांपैकी मनरेगा जॉब कार्ड, बँक, पोस्ट ऑफीस कार्यालयाकडून निर्गमित केलेले फोटोसहीत पासबुक, आरोग्य विमा, स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्‍स, पॅन कार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआय मार्फत वितरीत केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसहित पेंशन कागदपत्रे, केंद्र आणि राज्य शासन कर्मचाऱ्यांचे छायाचित्रासह ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडील ओळखपत्र यापैकी एक दस्ताऐवज सादर करता येईल.

जिल्ह्यामध्ये एकूण 15 लक्ष 50 हजार 704 मतदार असून त्यापैकी पुरूष मतदार 8 लक्ष 1 हजार 587, स्त्री मतदार 7 लक्ष 45 हजार 762, तृतीयपंथी मतदार 34 तर सैनिक मतदार 3 हजार 298  आहेत.  त्यांच्या करिता अकोला जिल्ह्यात एकूण 1680 मतदार केंद्र असून प्रति मतदार केंद्र एक मतदार नोंदणी अधिकारी कार्यान्वीत आहे. तरी मतदारांनी मतदार ओळखपत्रासोबत आधार क्रमांक संलग्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ